अयोध्येतील श्री रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेचा सुपुर्द केला मंगलमय प्रसाद !
रामनाथी (गोवा) – विश्व हिंदु परिषदेचे कोकण सहमंत्री श्री. अनिरुद्ध भावे यांनी ३ मार्च या दिवशी येथील सनातनच्या आश्रमाला भेट दिली. अयोध्येत श्री रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेचा (श्रीरामाचे बालकरूप) मंगलमय प्रसाद देण्यासाठी ते आश्रमात आले होते. या वेळी सनातनचे सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांच्याकडे त्यांनी प्रसाद सुपुर्द केला.
सद्गुरु गाडगीळ यांनी श्री. भावे यांचा शाल आणि श्रीफळ देऊन सत्कार केला, तसेच त्यांना राष्ट्र, धर्म आणि अध्यात्म यांच्याशी निगडित ग्रंथ भेट देण्यात आले. या मंगलप्रसंगी सनातनचे संत पू. पृथ्वीराज हजारे यांचीही वंदनीय उपस्थिती लाभली. ‘सनातन प्रभात’चे समूह संपादक श्री. नागेश गाडे आणि ‘सनातन अध्ययन केंद्रा’चे समन्वयक श्री. संदीप शिंदे हेही या वेळी उपस्थित होते.
भेटीत श्री. भावे यांनी आश्रमात चालणार्या राष्ट्र आणि हिंदु धर्म प्रसारकार्याची माहिती अत्यंत आस्थेने जाणून घेतली. ते म्हणाले, ‘‘हिंदूंच्या विरोधात रचल्या गेलेल्या कथानकाचा विरोध करण्यासाठी अशा कार्याची आवश्यकता आहे.’’