प.पू. स्वामी गोविंददेव गिरि महाराज हे क्षणोक्षणी राष्ट्राच्या हिताचा विचार करणारे आणि तो विचार प्रत्यक्ष कृतीत उतरवून पथदर्शी कार्य सातत्याने करत रहाणारे असे ‘राष्ट्रयोगी’ आहेत ! आळंदी, पुणे येथे ४ ते ११ फेब्रुवारी या काळात प.पू. स्वामी गोविंददेव गिरि महाराज यांच्या पंच्याहत्तरीच्या निमित्ताने ‘गीताभक्ती अमृत महोत्सवा’चे आयोजन करण्यात आले. या महोत्सवात उपस्थित संत आणि मान्यवर यांनी प.पू. स्वामीजींची गुणवैशिष्ट्ये कथन केली. या वेळी प.पू. स्वामीजींच्या विविध भावमुद्रा आणि जाणवलेली गुणवैशिष्ट्ये या लेखाच्या माध्यमातून त्यांच्या चरणी कृतज्ञतापूर्वक अर्पण करत आहे !
प.पू. स्वामी गोविंददेव गिरि महाराज यांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये !
१. कर्तेपणा नसणे !
प.पू. स्वामीजींच्या अनुयायांनी त्यांचा अमृत महोत्सव साजरा करण्याविषयी सांगितल्यावर त्यांनी ‘यात माझा सन्मान न करता ७५ साधू-संतांचा सन्मान करा’, असे सांगितले. तसेच गीता, वेद यांच्या प्रसारासाठी कार्यक्रम करण्याचे आवाहन स्वामीजींनी केले. त्यामुळे या कार्यक्रमाचे स्वरूप ‘गीताभक्ती अमृत महोत्सव’ असे ठेवण्यात आले.
२. विनम्रता
प.पू. स्वामी गोविंददेव गिरि महाराज यांनी श्री कांची कामकोटी पीठाचे जगद्गुरु शंकराचार्य श्री विजयेंद्र सरस्वतीजी महाराज यांचा सन्मान केल्यावर सर्वांसमक्ष त्यांना साष्टांग दंडवत घातला. त्यासहच अनेक भागवत कथाकार आणि कीर्तनकार यांनाही साष्टांग नमस्कार केला. यावरून त्यांची विनम्रता, श्रद्धा आणि भक्ती दिसून येते. ‘माझा कार्यक्रम आहे’, असा कोणताही ‘मी’पणाचा भाव त्यांच्यामध्ये आढळत नव्हता. ‘त्यांची प्रतिमा, प्रतिष्ठा त्यांच्या कृतीच्या आड येत नाही’, असे जाणवले.
३. शिस्तबद्धता आणि नियोजन
कार्यक्रमात अनेक संत, महंत उपस्थित होते. त्या प्रत्येकांचा सन्मान विशिष्ट पद्धतीने होणे आवश्यक होते. अनेक संत कार्यक्रमपत्रिकेपेक्षा वेगळ्या वेळी किंवा अन्य दिवशी आले. तरीही तेथे कुठेही गडबड, गोंधळ किंवा चूक झाल्याचे निदर्शनास आले नाही. उदा. काही संतांचा सन्मान पांढरी उपरणी, तर काहींचा भगवी वस्त्रे देऊन करणे आवश्यक होते. त्यांना घालण्यात येणारे हार, शाल, वस्त्रे विविध प्रकारची आणि त्यांच्या पठडीला अनुसरून होती. यात कुठेही गडबड झाली नाही.
४. संतांप्रती भक्तीभाव
महोत्सवासाठी आलेल्या प्रत्येक संतांप्रती त्यांच्या मनात भक्तीभाव होता, तसेच त्यांच्याप्रती असणारी कृतज्ञता त्यांच्या चेहर्यावर प्रकट होत होती. सर्वांना नमस्कार करून प्रेम आणि आदरपूर्वक त्यांना आसनस्थ करणे, सन्मानित करणे हे ते स्वतः जातीने करत होते.
५. प्रचंड कार्यक्षमता आणि उत्साह
सर्व सत्रे ऐकण्यासाठी आणि मध्ये मध्ये भाष्य करण्यासाठी ते तत्पर होते. उरलेल्या वेळेत मुलाखती देणे, अतिथींचे आदरातिथ्य करणे, हे सर्व ते अत्यंत उत्साहाने आणि आनंदाने करत होते. ते कुठेही थकल्याचे किंवा त्यांनी टाळाटाळ केल्याचे आढळले नाही. ते सतत आनंदी दिसत होते आणि त्यांच्या चेहर्यावर हास्य होते.
६. अनेक प्रसिद्धीपराङ्मुख संतांचा परिचय करवून देणे
प्रसिद्धीपासून दूर असणारे अनेक संत आणि महात्मे यांची या कार्यक्रमाच्या निमित्ताने समाजाला ओळख करून त्यांचे कार्य समाजापुढे ठेवण्याचे कार्य प.पू. स्वामीजींनी यानिमित्ताने केले.
७. राजसत्ता आणि धर्मसत्ता यांना एकाच मंचावर आणण्याचे अद्भुत कार्य
या कार्यक्रमाच्या निमित्ताने विविध संत, महंत, राष्ट्रजागरण करणार्या व्यक्ती आणि राजकारणी असे विविध क्षेत्रांतील मान्यवर अतिथी म्हणून आले होते. याप्रकारे राजसत्ता आणि धर्मसत्ता यांना एकाच मंचावर आणण्याचे अद्भुत कार्य स्वामीजींनी अमृत महोत्सवाच्या निमित्ताने केले.
प.पू. स्वामीजींचे अनेक पैलू यानिमित्ताने जनमानसासमोर आले. यांतील काही ठळक पैलू येथे मांडण्याचा प्रयत्न केला आहे. त्यासाठी प.पू. स्वामी गोविंददेव गिरि महाराज यांच्या चरणी कोटी कोटी कृतज्ञता !
– आधुनिक वैद्या ज्योती काळे, पुणे (१०.२.२०२४)
महोत्सवात उपस्थित संत आणि मान्यवर यांनी प.पू. स्वामीजींची कथन केलेली वैशिष्ट्ये !१. आमच्या वेदपाठ आश्रमात स्वामीजींमुळे पाण्याची व्यवस्था झाली ! – पू. भारतानंदगिरी महाराज प.पू. स्वामी गोविंददेव गिरि महाराज यांचा ज्या दिवशी यांचा जन्म झाला, त्या दिवशी भारतमाता तिच्या सुपुत्राला प्राप्त करून धन्य झाली. आमच्या वेदपाठ शिकवणार्या आश्रमात प.पू. स्वामीजींमुळे पाण्याची व्यवस्था झाली. २. भाग्यनगर येथील महंत श्री देवप्रसाददास स्वामीजी महाराज यांनीही प.पू. स्वामी गोविंददेव गिरि महाराज यांनी त्यांच्या आश्रमाला केलेल्या अमूल्य साहाय्याविषयी या वेळी प.पू. स्वामीजींना धन्यवाद दिले. ३. यज्ञप्रसाद असल्याप्रमाणे राष्ट्र-धर्म यांचे कार्य करणारे प.पू. स्वामी गोविंददेव गिरि ! – प.पू. स्वामी श्री सवितानंद महाराज, मांडवी, नर्मदा तट प्रत्येक हिंदु हा यज्ञप्रसाद आहे. संयमी जीवन जगणार्या दांपत्याची अपत्ये ही यज्ञप्रसाद असतात. त्यांची खूण म्हणजे पुढे जाऊन ही अपत्ये राष्ट्र आणि धर्म यांचे रक्षण अन् संवर्धन करण्याचे कार्य करतात. प.पू. स्वामी गोविंददेव गिरिजी करत असलेल्या कार्यावरून याची प्रचीती येते. ४. सर्वांविषयी आत्मीयता असणारे प.पू. स्वामी ! – पू. श्री चिन्न जिअर स्वामी जेव्हा प.पू. स्वामी गोविंददेव गिरिजी ठिकठिकाणी वेदपठण शाळांचा आरंभ करत होते, तेव्हा मी काही देणगी त्यासाठी दिली होती, त्यानंतर मी त्याविषयी विसरूनही गेलो; पण जेव्हा प्रत्यक्षात प.पू. स्वामीजींना भेटलो, तेव्हा त्यांनी सर्वांसमक्ष याचा उल्लेख केला. तेव्हाच त्यांची प्रत्येकाविषयीची आत्मीयता लक्षात आली. ५. प.पू. स्वामीजींनी रामलल्लाच्या न्यासाचे कोषाध्यक्षपद भूषवून पदाची प्रतिष्ठा उंचावली ! – पुष्पेंद्र कुलश्रेष्ठ, प्रखर हिंदुत्वनिष्ठ व्याख्याते प.पू. स्वामी गोविंददेव गिरिजी यांनी रामलल्लाच्या न्यासाचे कोषाध्यक्ष पद भूषवून कोषाध्यक्ष पदाची प्रतिष्ठा उंचावली आहे. त्यामुळे यानंतर कोषाध्यक्ष बनणार्या व्यक्तीला १०० वेळा विचार करावा लागेल की, या पदाला मी योग्य आहे का ? आणि त्याच भावाने मी हे पद सांभाळू शकेन का ? याचे सकारात्मक उत्तर देणारी व्यक्तीच हा पदभार सांभाळू शकेल ! ६. साध्वी ऋतंभरा आणि अनेक साधू-संत : अयोध्येतील रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा प.पू. स्वामी गोविंददेव गिरिजी यांच्यामुळे शक्य झाली ! ७. पू. स्वामी श्री माधव प्रियदासजी महाराज : समाधीनिष्ठ, दुःखापासून अलिप्त आणि इंद्रियनिग्रह असणारे असे प.पू. स्वामीजी आहेत ! ८. कांची कामकोटी पीठाध्यक्ष जगद्गुरु शंकराचार्य श्री विजयेंद्र सरस्वती महाराजांनी संपूर्ण कार्यक्रमाला ७ दिवस उपस्थित राहून आशीर्वाद दिले. यातूनच प.पू. स्वामी गोविंददेव गिरि महाराज यांची महती लक्षात येते. – आधुनिक वैद्या ज्योती काळे |