प्रबोधन लेखमालिका
‘ऋग्वेदातून निसर्गाच्या सौंदर्याचे अतिशय सुरेख वर्णन आले आहे. साहित्यिक रा.चिं. ढेरे यांनी एका ठिकाणी म्हटले आहे, ‘वैदिक सूक्तांना त्या काळातील लोकगीते म्हणू शकतो. लोकगीतांमधील निसर्गाविषयी असणारा भक्तीयुक्त आदर, निसर्गाशी जडलेले जिव्हाळ्याचे नाते आणि त्यामधील एक स्वाभाविक मातीचा गोडवा वैदिक सूक्तांमधून दिसतो.’ ऋग्वेदामधून निसर्गाच्या शक्तींच्या ठिकाणी असलेली भक्ती, प्रेम, आदर आणि कृतज्ञता ओथंबून वहाते. हे नाते केवळ भावनिक नाही. त्याचसह त्यांचे धर्म, अर्थ, काम, कृषी, शत्रूबोध, विजिगीषू वृत्ती, जिज्ञासा, वैज्ञानिक दृष्टी यांचे दर्शनही घडते. ऋग्वेदातील काही सूक्तांविषयीची माहिती येथे देत आहोत.
१. वरुण देव
ऋग्वेदात वरुणाला ‘ऋतम्’चा रक्षक आणि ‘पोषक देव’ म्हटले आहे. सृष्टीचा ताल, वेग, तोल, लय सांभाळणारा हा देव आहे. जे सृष्टीचे नियम मोडतात, त्यांच्यावर तो स्वतःचे पाश सोडून त्यांना शिक्षा करतो. ‘वरुणसूक्ता’त (ऋग्वेद, मण्डल २, सूक्त २८) ‘कूर्म गार्त्समद’ ऋषी म्हणतात, ‘आम्ही तुझ्या आज्ञेत राहू. तुला खोटेपणा आवडत नाही, हे आम्ही जाणतो; म्हणून आम्ही सत्याने वागू. तूच या सृष्टीला नियम घालून दिले आहेस. सृष्टी तुझ्या नियमांनी चालते. तू आमच्यावर कृपा कर, त्याने आम्ही निर्भय होऊ. आम्ही तुझे सामर्थ्य जाणतो ! तुझा पराक्रम जाणतो; म्हणूनच आम्ही तुझा जयजयकार करतो !’
निसर्गाचे बारकाईने निरीक्षण करणार्या ऋषींनी वर्षाचे ६ ऋतू आणि १२ मास यांमध्ये विभाजन केले होते. ‘ऋतुसूक्ता’त (ऋग्वेद, मण्डल १, सूक्त १५) प्रत्येक ऋतूंच्या स्वामीला ऋषींनी प्रार्थना केली आहे.
२. अरण्यानीदेवी
ऋग्वेदाच्या १० व्या मंडलात ‘अरण्यानीदेवी’चे सूक्त आले आहे. या अरण्यदेवीची स्तुती करतांना ऋषी म्हणतात, ‘‘हे वृक्षलतांनी नटलेली देवी ! तू मनुष्य वस्तीपासून फार दूर रहाते ! तू अनेक प्राण्यांना आश्रय देते. प्राण्यांना अन्न, औषधी इत्यादी देऊन तू त्यांच्यावर उपकार करते. गायींना तूच चारा देते. कृषीवलासाठी तू उपकारक ठरते. संध्याकाळच्या वेळी मात्र तुझ्यामध्ये चरणारे गायी-बैल तुझ्यापासून दूर जातात. बैलगाडीतून प्रवास करणारे लोक संध्याकाळच्या वेळी तुझ्यापासून दूर जातात. अंधार पडायच्या आधी तुझ्या आवाजांनी भयभीत होऊन लोक तुझ्यातून भराभर बाहेर पडतात. एरव्ही तुझ्याजवळ निवास करणारा मनुष्य मधुर फळांचा आस्वाद घेतो. हे अरण्यानीदेवी, मी तुझे स्तवन करतो.’’
३. उषादेवी
निसर्गाशी जवळीक साधलेले ऋषी दिवसाचा आरंभ ब्राह्ममुहूर्तापासून करतात. साधारण पहाटे ३ ते ५ ही वेळ, म्हणजे ‘ब्रह्ममुहूर्त’. त्यानंतर उषा, नंतर प्रभा, मग अरुणोदय आणि मग सूर्योदय या क्रमाने दिवस चालू होतो. सर्वसाधारणपणे उषा दीड घटका, म्हणजे ३६ मिनिटांची असते. प्रभा २४ मिनिटांची, अरुणोदय ६ मिनिटांचा आणि मग सूर्योदय होतो.
उषा ही कालस्थिती जरी असली, तरी ऋग्वेदात तिला देवता मानले आहे. उषादेवीचे मनोरम वर्णन ठिकठिकाणी आले आहे. (ऋग्वेद, मण्डल १, सूक्त ४८ आणि ४९) ‘उषासूक्तात’ उषेचा महिमा गातांना म्हटले आहे, ‘उषःकाल होताच व्यसनी, कपटी, चोर, विश्वाला त्रास देणारे प्राणी निद्रेकडे जातात, तर पक्षी, गायी इत्यादी प्राणी जागे होतात. उषा येताच प्रवासी मार्गस्थ होतात. पक्षी आकाशात उडू लागतात. मनुष्य कार्यास उद्युक्त होतात. सामगायकांना स्फूर्ती लाभते, भक्तांना भक्तीची आणि धन-कामिकांना कर्म प्रेरणा मिळते.
नित्य नवीन रूपात अवतरणारी उषा पृथ्वीवरील सर्व पदार्थांना गोचर करते. ती सर्व प्राण्यांना कार्यप्रवृत्त करते. प्रतिदिन नव्याने उदयास येणारी उषा प्राचीन असूनही ती तरुणी आहे. अपहरणकुशल उषा प्राणिमात्रांचे आयुष्य प्रतिदिन हळूहळू हरण करते. दावे सोडतांच चौफेर उधळणार्या गायींप्रमाणे उषेची प्रभा सर्वत्र पसरते. चिरयुवती आणि हिरण्यवर्णीय उषादेवता अंधाररूपी वस्त्राचा त्याग करून प्रभारूपी निर्मल वस्त्र धारण करते ! (ऋग्वेद, मण्डल ३, सूक्त ६१) उज्ज्वलवर्णा, मंगलमयी, सुशोभित किरणांनी प्रकाशित होणारी, अंधकाररूपी शत्रूला दूर करणारी, पर्वत आणि अरण्यांतील मार्ग तू सुगम करते. (ऋग्वेद, मण्डल १, सूक्त ९२)
४. सूर्य
उषेच्या मागून येणार्या सूर्याला तिचा पती म्हटले आहे. ‘सवितृसूक्ता’त सूर्याचे अत्यंत उत्तम वर्णन आहे. सूर्याचा रथ सुवर्णाचा आहे. त्याला प्रकाशमान घोडे जोडलेले आहेत. सूर्याचे हात, केस आणि वस्त्रे सुवर्णाची आहेत. ‘अंधकारमय प्रदेशाला प्रकाशात आणणारा, अविनाशी, पृथ्वीच्या ८ दिशा, सप्तसिंधू, द्युलोक (स्वर्ग) आणि पृथ्वी यांमधून संचार करून रोगाचा नाश करणार्या सूर्याला आम्ही आवाहन करतो. तो आमचा मार्ग सुखकारक करो आणि आम्हास संपत्ती प्रदान करो.’ ऋग्वेदाच्या तिसर्या मंडलातील गायत्री छंदातील हा सूर्याची स्तुती करणारा २४ अक्षरांचा मंत्र प्रसिद्धच आहे, ‘तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि । धियो यो नः प्रचोदयात् ।। (अर्थ : दैदीप्यमान भगवान सविता (सूर्य) देवाच्या त्या तेजाचे आम्ही ध्यान करतो. ते (तेज) आमच्या बुद्धीला प्रेरणा देवो.)’
५. नदीदेवी
ऋग्वेदात ठिकठिकाणी नद्यांची स्तुती आली आहे. १० व्या मंडलातील ७५ व्या नदीसूक्तात गंगेपासून पुढील पश्चिमेच्या नद्या एका पाठोपाठ एक नमूद केल्या आहेत. यावरून काही अभ्यासकांचे असे मत आहे की, सर्वांना पूर्वेच्या नद्या आधी ठाऊक होत्या आणि मग जसे ते पश्चिमेला गेले, तसे तिकडच्या नद्या त्यांना ठाऊक झाल्या. या नद्या आहेत – गंगा, यमुना, सरस्वती, शतद्रू (सतलज), परुष्णी, असिवनी, मरुत्वृद्धा, वितस्ता, सुषोमा, आर्जिकिया आणि सिंधू.
सरस्वतीच्या जलद आणि शक्तीशाली प्रवाहाचे वर्णन करतांना (ऋग्वेद, मण्डल ६, सूक्त ६१) म्हटले आहे, ‘‘हत्ती ज्याप्रमाणे कमळ उपटून टाकतो. त्याप्रमाणे तू आपल्या प्रभावी लाटांनी पर्वत उखडून टाकले. देवांच्या निंदकांना तू पळवून लावले. निर्मल जलधारांनी निनादत जाणारी, सामर्थ्यवान, उदकसंपन्न, ७ नद्यांची भगिनी असलेली सरस्वती ! तू आम्हा भक्तांचे रक्षण कर ! आमचे धान्य उगवू दे, आम्हाला निर्मळ कर ! आम्हाला सदैव तुझा आश्रय लाभू दे !’’
ऋग्वेदाच्या तिसर्या मंडलात विश्वामित्रऋषि आणि नदी यांचा अनोखा संवाद (ऋग्वेद, मण्डल ३, सूक्त ३३) आला आहे. विश्वामित्रांना बिपाश (रावी) आणि शतद्रू (सतलज) या नद्या पार करायच्या होत्या. नद्यांनी वाट करून द्यावी; म्हणून त्यांनी नद्यांची स्तुती केली. तेव्हा ते म्हणतात, ‘‘तुम्ही दोघी पर्वतात उगम पावून समुद्राला मिळण्यासाठी अश्वाप्रमाणे वेगाने धावता ! देवाने नेमून दिलेल्या मार्गाने तुम्ही जाता. मी सोमयज्ञ करण्यासाठी पैलतीरी निघालो आहे; म्हणून तुम्ही काही काळ तुमचा प्रवाह खंडित करा ! मला पलीकडे जायला वाट द्या. माझ्या रथाच्या आसाला स्पर्श होईल, इतका तुमच्या पाण्याचा प्रवाह राहू द्या, अशी तुम्हाला विनवणी करतो !’’ त्यावर बाळाला दूध पाजण्यासाठी माता ज्याप्रमाणे वाकते, त्याप्रमाणे त्या नद्या बालकाच्या हट्टासाठी वाकल्या. विश्वामित्रऋषींनी नदी ओलांडली आणि मग नद्यांना म्हणाले, ‘‘आता तुम्ही पूर्ववत् प्रवाही व्हा ! सर्वकाळ जलसमृद्ध रहा !’’
६. कृषी
ऋग्वेदाच्या ४ थ्या मंडलातील ‘कृषीसूक्ता’त क्षेत्रपती – शेतमालक देवता, शुन (नागर), शुनासीर (नांगराचा फाळ), सीता (नांगरलेले सुपीक भूमी) यांचे स्तवन आहे. शेत नांगरतांना, बी पेरतांना, पाणी देतांना या सूक्ताचे पठण केले जाते. क्षेत्रपती म्हणजे, शेताच्या देवतेला ऋषी म्हणतात, ‘हे क्षेत्रपती ! तू अश्व, धेनू, अन्न, धन आणि सुख देणारा स्वामी आहेस ! आम्हा शेतकर्यांना तू शेत नांगरण्यास साहाय्य कर. गाय जसे वत्साला दूध देते, त्याप्रमाणे तू आम्हाला शुद्ध आणि गोड जल दे. तू जलस्वामी असल्याने तुला हे अशक्य नाही ! औषधी वनस्पती आरोग्यदायी होऊ दे ! पृथ्वी अन्नसमृद्ध होऊ दे ! नद्या जलसमृद्ध होऊ दे ! मेघ मधुर जलवर्षाव करोत आणि क्षेत्रपती आम्हाला प्रसन्न होऊन आम्हाला अन्न देवो !’’
‘‘हे शुन (नांगर) देवते ! नांगर ओढणारे पशू आणि नांगर चालवणारे लोक सुखी होऊ देत ! ते उत्तम प्रकारे भूमी नांगरू देत. बैलांना जुंपण्याच्या दोरीचा बैलांना त्रास न होवो ! त्यांच्यावर चाबुक सुद्धा सुखाने उगारला जाऊ देत ! हे शुनासीर (नांगराचा फाळ) देवा, देवतांनी आकाशातून वृष्टी करून सिंचन केलेली पृथ्वी आम्हाला नीट नांगरता येवो ! शेतकरी सुखाने बैलांच्या साहाय्याने नांगरणी करोत. हे सीतादेवी (नांगरलेली सुपीक भूमी), सर्वांनी स्तुती करावी, अशा भाग्यशालिनी सीते, तू पृथ्वीच्या उदरात प्रवेश करून आम्हाला धान्य देते ! इंद्र या सीतेला आधार देवो !’’
७. गोसूक्त
ऋग्वेदात आलेले गायींचा गौरव करणारे सूक्त (ऋग्वेद, मण्डल ६, सूक्त २८) ‘गोसूक्त’ म्हणून प्रसिद्ध आहे. गायीचे दूध काढण्यापूर्वी या सूक्ताचे पठण करावे. गायीच्या सन्मुख उभे राहून, तिला नमस्कार आणि स्पर्श करून हे सूक्त गावे. गायीची वृद्धी करणारे, दूधदुभते वाढवणारे, गुरांना निरोगी ठेवणारे हे सूक्त आहे. प्रतिदिन संध्याकाळी गायी घरी आल्यावर त्यांना गोठ्यात संरक्षित करावे. नैऋत्य दिशेच्या कोपर्यात गायीच्या शेणींच्या साहाय्याने अग्नी प्रज्वलित करून त्यामध्ये धूप, गुग्गुळ, चंदन आदी जाळावे.
‘गायी आमच्या घरात येऊन सर्वांचे मंगल करो ! आमच्या गोठ्यात येताच गायी प्रसन्न होवो. या गोठ्यातील वेगवेगळ्या वर्णाच्या गायी वत्सयुक्त होऊन उषःकाळी दूध देवो. आम्ही गायीच्या साहाय्याने यज्ञ करू. आम्ही धेनुसंपन्न होऊ. या गायी नष्ट न होवोत. त्यांना कुणी चोरू नये. शत्रूची हत्यारे त्यांना खुपू नयेत. गायी आमचे धन आहे. इंद्राने आम्हास गोधन द्यावे. गायी आम्हाला इंद्ररूप आहेत. त्यांच्या ठिकाणी आमची श्रद्धा दृढ होवो. गायी आपल्या पंचगव्याने आम्हास पुष्ट करो. त्यांनी आमच्या कृश आणि रोगी शरिराला सुंदर करावे. हे गायींनो, तुम्ही उत्तम तलावाचे पाणी प्यावे, तुम्ही चांगले गवत खावे आणि तुम्ही सवत्स व्हावे’, अशी आम्ही प्रार्थना करतो.
८. नासदीयसूक्त
ऋग्वेदाच्या शेवटच्या मंडलात नासदीयसूक्त ऋग्वेदांतील एक उत्कृष्ट सूक्त आहे. यामध्ये सृष्टीची रचना कशी झाली ? केव्हा आणि कशापासून झाली ? याविषयीचे चिंतन आले आहे. सृष्टीचे अनादीपण, देवतांचे आधुनिकपण यांमधून प्रकट होते. ऋषी म्हणतात, ‘फार पूर्वी सत् नव्हते आणि असत् पण नव्हते. त्या वेळी पृथ्वी आणि आकाश, मृत्यू अन् अमरत्व, रात्र आणि दिवस हे तरी कुठे होते ? तेसुद्धा नव्हते. त्या वेळी अंधाराने अंधाराला झाकून टाकले होते. सर्व काही अज्ञात होते. देवगणसुद्धा या सृष्टीनंतर निर्माण झाले. त्यामुळे कदाचित् हा पसारा जिथून निर्माण झाला, त्या हिरण्यगर्भाला याचे ज्ञान असेल तर असेल !’
– दीपाली पाटवदकर, नागपूर
(साभार : त्रैमासिक ‘प्रज्ञालोक’, ऑक्टोबर – डिसेंबर २०२३)