चित्रपट अभिनेते आमीर खान यांनी चित्रपटांतून महिलांना ‘आयटम’ म्हणून दाखवले जाण्यावरून टीका करत स्वतःही अशा प्रकारच्या कृतीला समर्थन देत त्यात सहभागी झाल्यावरून क्षमा मागितली आहे. उशिरा शहाणपण सुचणे हे एकाअर्थी चांगलेही असते आणि ते आमीर खान यांनी केले, असेच कुणालाही वाटेल; पण इतक्यावर थांबता कामा नये, तर या संदर्भात चळवळ राबवली गेली पाहिजे. महिलांना एक भोगवस्तू समजण्याची आणि त्यांना तसे चित्रपटातून दाखवण्याची जी काही विकृती भारतातच नव्हे, तर जगभरात पसरली आहे, त्यावर आघात करण्याचा प्रयत्न झाला पाहिजे. मध्यंतरी हिंदी चित्रपटसृष्टीत (ज्याला ‘हॉलिवूड’च्या अंधानुकरणातून ‘बॉलिवूड’ म्हटले जाते) ‘मी टू’ (हिंदी चित्रपटसृष्टीत कामाच्या बदल्यात लैंगिक शोषण झालेल्या अभिनेत्रींनी चालू केलेली चळवळ) नावाची चळवळ चालू झाली होती आणि त्याचा काही प्रमाणात प्रभाव, दबाव निर्माण झाला; मात्र ती पूर्ण यशस्वी झाली. त्यामुळे अशा घटना पूर्णपणे थांबल्या, असे म्हणता येणार नाही. अशी चळवळ चालू केली पाहिजे आणि तिला समाजातील संस्कृतीप्रेमी प्रेक्षकांनी साहाय्य केले पाहिजे.
व्यावसायिकतेमुळे विकृती !
भारतात चित्रपटांची निर्मिती दादासाहेब फाळके यांनी वर्ष १९१३ मध्ये सर्वप्रथम केली. त्यांच्या पहिल्या चित्रपटाचे नाव होते ‘राजा हरिश्चंद्र’ ! यानंतर अनेक चित्रपटांची निर्मिती होऊ लागली. त्या वेळी बहुतेक चित्रपट धार्मिक कथांवर आधारित होते आणि विशेष म्हणजे त्यात महिला पात्राची भूमिका पुरुष करत होते. पुढे काही वर्षांतच महिलाही चित्रपटात काम करू लागल्या; मात्र त्यातही सोज्वळता होती. काळ पालटत गेल्यानंतर समाजाची मानसिकताही पालटत गेली. समाजाला हवे आहे; म्हणून महिलांना अर्धनग्न अवस्थेत दाखवण्याच्या पाश्चात्त्यांच्या कृतीचे अंधानुकरण येथे चालू झाले आणि आज अशी स्थिती आली आहे की, चित्रपटांमध्ये अभिनेत्रीने पूर्ण शरीरभर कपडे घालणे हे चुकीचे मानले जाऊ लागले आहे. महिला पात्राने साडी नेसलेली असणे ही गोष्ट दुर्मिळ होऊ लागली आहे. काही चित्रपट तर थेट अश्लीलच असतात आणि त्यात नग्नतेखेरीज काहीच नसते. शारीरिक संबंधांचे चित्रण दाखवण्यापर्यंत आज हिंदी चित्रपटसृष्टी पोचली आहे. ही प्रगती आहे कि अधोगती ? हे वेगळे सांगण्याची आवश्यकता राहिलेली नाही. ही स्थिती असतांना आमीर खान यांनी सांगितलेले सूत्र पुष्कळच सौम्य आहे, असेच म्हणावे लागेल. ‘लोकांना हवे म्हणून आम्ही दाखवतो’, असे समर्थन चित्रपट निर्माता आणि दिग्दर्शक करतात. चित्रपट निर्मिती हा एक व्यवसाय आहे आणि चित्रपट निर्माण करणारा त्यातून पैसे कमावण्याचा विचार करतो. त्यासाठी तो समाजाला या चित्रपटाकडे आकृष्ट करण्याचा प्रयत्न करतो. त्यातून ‘समाजावर काय परिणाम होत आहे आणि समाज कुठल्या दिशेला जात आहे ?’, याच्याशी त्याचे काहीच देणे-घेणे नाही’, अशा आविर्भावात तो असतो, असेच चित्र आहे. यात केवळ अश्लीलताच नव्हे, तर हिंसाचार, अनैतिकता, भ्रष्टाचार आदी अनेक गोष्टी आहेत. संपूर्ण चित्रपटात तेच दाखवून केवळ शेवटी सत्य आणि नैतिकता यांचा विजय होतो, असे दाखवून ‘आम्ही समाजप्रबोधन करत आहोत’, असे भासवण्याचा आणि धूळफेक करण्याचा प्रयत्न केला जातो.
महिलांचा सन्मान हवाच !
चित्रपट हे एक असे माध्यम आहे, ज्यातून अल्प कालावधीत एखादा विषय समाजाला सांगता येतो आणि त्याचा प्रभाव समाजावर अनेक वर्षे राहू शकतो. किंबहुना त्यामुळे समाजामध्ये मोठा पालटही होऊ शकतो. काही वेळेस तो तात्कालिक असू शकतो किंवा दीर्घकालीनही असू शकतो. याचे उदाहरण म्हणजे वर्ष १९७५ मध्ये प्रदर्शित झालेला ‘जय संतोषी माता’ हा चित्रपट ! या चित्रपटाला भाविकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. त्यानंतर सहस्रो लोक संतोषीमातेची भक्ती करू लागले, व्रत करू लागले. मुंबईमध्ये संतोषीमातेचे मंदिरही उभारण्यात आले. तेथे प्रत्येक शुक्रवारी मोठी गर्दी जमू लागली; मात्र आध्यात्मिक दृष्टीने ती एका कुटुंबाची कुलदेवता असल्याने तिच्या साधनेने अन्य लोकांना अपेक्षित असा लाभ न मिळाल्याने समाजावरील या देवतेचा प्रभाव नंतर ओसरला. म्हणजेच काय, तर समाजासमोर काय ठेवले जात आहे ? आणि समाजावर त्याचा प्रभाव कसा पडतो ? हे लक्षात येते. महिलांना समाजासमोर ‘आयटम’ म्हणून सातत्याने दाखवण्यात आले, तर संपूर्ण समाजावर तोच संस्कार होईल आणि समाज महिलांकडे त्याच दृष्टीने पाहील. याच्या उलट महिलांना भारतीय संस्कृतीनुसार देवीच्या स्वरूपात दाखवले, तिचा तसा सन्मान केल्याचे दाखवले, तर वेगळा परिणाम होऊ शकतो; मात्र असे चित्रपट काढून ते समाजाने स्वीकारले नाहीत, तर निर्मात्याला मोठी आर्थिक हानी होईल, असा विचार येतो. त्यामुळे निर्माते असे चित्रपट बनवत नाही. जर अशी मानसिकता असेल, तर ती चुकीची म्हणावी लागेल. ‘मदर इंडिया’सारख्या चित्रपटाला प्रचंड प्रतिसाद मिळाला होता, हे विसरता कामा नये. महिलांना केंद्रस्थानी ठेवून काढण्यात आलेल्या अनेक चित्रपटांचा गौरव झाला आहे, हे नाकारता येणार नाही. समाजातील एका वर्गाला ‘आयटम साँग’ आवडते आणि त्याचे संगीत आवडते; म्हणून तसे केले पाहिजे, याला आता या चित्रपटसृष्टीतील आमीर खान यांच्यासारख्या अभिनेत्यांनी विरोध चालू केला पाहिजे आणि हा प्रकार बंद होईपर्यंत चळवळ राबवली पाहिजे. ‘बॉलिवूड’मध्ये नैतिकता किती शिल्लक राहिली आहे किंवा ती राहिली तरी आहे का ?’, याचाही विचार केला पाहिजे. बॉलिवूडपेक्षा दक्षिण भारतातील किंवा काही प्रादेक्षिक भाषांतील पारंपरिक विचारांचे चित्रपट अधिक लोकप्रिय ठरत आहेत, याचा विचार केला पाहिजे, उदा. बाहुबली, कांतारा आदींचा विचार करता येईल. दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टीत काम करणारे त्यांची संस्कृती जपतात, असे दिसते. ‘बॉलिवूडला मुळात संस्कृतीच नाही, तर तेथे केवळ विकृतीच आहे’, असे म्हटले, तर ते कुणी चुकीचे म्हणणार नाही. काही अपवादात्मक चांगल्या गोष्टी करणारेही आहेत, उदा. ‘कश्मीर फाईल्स’, ‘द केरल स्टोरी’ आदी चित्रपट वास्तव दाखवणारेही आहेत. अशांना बॉलिवूडमधील चुकीच्या गोष्टी दिसतात आणि ते त्याच्यावर प्रहार करण्याचाही प्रयत्न करतात, तेव्हा या लोकांना वाळीत टाकण्याचा प्रयत्न केला जातो. हे सर्व पहाता एकूणच बॉलिवूडवर चर्चा झाली पाहिजे. यातून कुणी बॉलिवूडलाच बंद करायचे म्हणत असेल, तर तेही योग्य म्हणावे लागेल.
देशातील अनैतिकता दूर करण्याचा एक भाग म्हणून बॉलिवूडला टाळे ठोकावे लागेल किंवा त्याचे शुद्धीकरण करावे लागेल ! |