प.पू. स्वामी गोविंददेव गिरी महाराज यांच्या पंचाहत्तरीनिमित्त आळंदी (पुणे) येथे ‘गीताभक्ती अमृत महोत्सव’ साजरा होणार !

भारतातील जगद्गुरु शंकराचार्य, महामंडलेश्वर, सद्गुरु, संत यांची महनीय उपस्थिती !

डावीकडून अंजली तापडिया, डॉ. संजय मालपाणी आणि श्री. गिरीधर काळे

पुणे, २ फेब्रुवारी (वार्ता.) – प.पू. स्वामी गोविंददेव गिरी महाराज यांची पंचाहत्तरी साजरी होत आहे. त्यानिमित्त ‘गीताभक्ती अमृत महोत्सव’ आळंदी येथे ४ ते ११ फेब्रुवारी या कालावधीमध्ये साजरा होत आहे. या महोत्सवामध्ये विविध धार्मिक अनुष्ठाने, श्रीमद्भागवतकथा, कीर्तन, वेदशास्त्र संवाद, चिरंजीव पूजन, मातृशक्ती संमेलन, राष्ट्रभक्ती संमेलन आणि महानाट्य अशा कार्यक्रमांचे आयोजन केले आहे, अशी माहिती ‘गीता परिवारा’चे राष्ट्रीय कार्याध्यक्ष डॉ. संजय मालपाणी यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली. त्या वेळी संयोजन समितीचे कार्याध्यक्ष श्री. गिरीधर काळे आणि अंजली तापडीया या उपस्थित होत्या.

प.पू. स्वामी गोविंददेव गिरी महाराज

प.पू. स्वामी गोविंददेव गिरी महाराज यांचा जन्मदिवस हा ‘गीताभक्ती दिवस’ म्हणून गेली अनेक वर्षे साजरा केला जातो. या ‘गीताभक्ती अमृत महोत्सवा’मध्ये ८१ यज्ञ, ५१ ग्रंथांचे पारायण, तसेच ७५ ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान करण्यात येणार आहे. या वेळी ‘यह पुण्य प्रवाह हमारा’ आणि ‘रामायण’ अशा २ महानाट्यांचे सादरीकरण करण्यात येणार आहे. तसेच १० फेब्रुवारी या दिवशी इंद्रायणी नदीच्या घाटावर १० सहस्र विद्यार्थी ‘गीतापठण’ करणार आहेत. प्रखर राष्ट्रभक्त प.पू. स्वामी गोविंददेव गिरी महाराज यांनी वर्ष १९८६ मध्ये ‘गीता परिवारा’ची स्थापना केली. या माध्यमातून ७५ कोटी सूर्यनमस्कार अशा भव्य कार्यक्रमाचे संयोजन, ‘लर्न गीता’(गीता शिका) या उपक्रमातून १८६ देशांमध्ये १३ भाषांमध्ये आणि ८ सहस्र सेवाभावी प्रशिक्षकांच्या माध्यमातून ८ लाख गीताप्रेमींना नि:शुल्क ऑनलाईन गीता प्रशिक्षण दिले आहे. ‘महर्षि वेदव्यास प्रतिष्ठान’च्या माध्यमातून ३७ वेद विद्यालयांचे संचालन केले जाते. ८० अध्यापकांद्वारे १ सहस्र ९२० विद्यार्थ्यांना विनामूल्य वेद शिक्षण दिले जाते. ‘संत श्री ज्ञानेश्वर गुरुकुल’च्या माध्यमातून गुरुकुल पद्धतीने शिक्षण दिले जाते.