पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे लेखा परीक्षण ८ वर्षे झालेच नाही !

माहिती अधिकारातून उघड

पुणे – ‘पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणा’ची (पी.एम्.आर्.डी.ए.ची) स्थापना झाल्यापासून कोणत्याही प्रकारचे लेखा परीक्षण करण्यात आले नाही, अशी धक्कादायक माहिती ‘माहिती अधिकारा’तून समोर आली आहे. ‘या संस्थेचे लेखा परीक्षण केले आहे काय ?’ असा प्रश्न ‘नागरी हक्क संस्थे’चे अध्यक्ष सुधीर कुलकर्णी यांनी उपस्थित केला होता. (लेखा परीक्षण न होण्यास कारणीभूत असणार्‍या उत्तरदायींची चौकशी होऊन त्यांच्यावर कारवाई होणे आवश्यक ! – संपादक)

सुधीर कुलकर्णी म्हणाले, ‘‘पी.एम्.आर्.डी.ए. स्थापन झाल्यापासून विकसनापोटी किती निधी प्राप्त झाला ? प्रशासनाच्या वेतनावर किती व्यय झाला ? फर्निचरसह आणि कंत्राटी पद्धतीने काम करणार्‍या कर्मचार्‍यांवर किती व्यय झाले ? याविषयीची माहिती मागवण्यात आली होती.’’ त्यावर लेखा परीक्षण विभागातून, ‘एकत्रित माहिती उपलब्ध नाही. अहवाल उपलब्ध असून त्यातून माहिती घेऊ शकता’, असे उत्तर देण्यात आले.

पी.एम्.आर्.डी.ए. सारख्या कायद्याने स्थापित झालेल्या संस्थेचे गेली ८ वर्षे लेखा परीक्षण होत नाही, ही गोष्ट गंभीर आहे. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे या संस्थेचे अध्यक्ष असल्याने त्यांनी लक्ष घालून त्वरित लेखा परिक्षण करावे, अशी मागणीही कुलकर्णी यांनी केली आहे. (अशी मागणी करावी लागणे अपेक्षित नाही !  – संपादक)