लोणी काळभोर (पुणे) पोलीस ठाण्यातील ४ पोलीस कर्मचारी निलंबित !

  • जप्त केलेल्या दुचाकींची परस्पर विक्री केल्याचे प्रकरण

  • कुंपणानेच शेत खाण्याचा प्रकार !

लोणी काळभोर (जिल्हा पुणे) – स्वत:च्या आर्थिक लाभासाठी ४ पोलीस कर्मचार्‍यांनी आरोपीला जप्त केलेल्या दुचाकी गाड्या विक्री करण्यास भाग पाडले. वेळोवेळी या पोलिसांना अन्वेषणासाठी बोलावण्यात आले; मात्र ते उपस्थित राहिले नाहीत. परिणामी कर्तव्यामध्ये कसूर केल्याप्रकरणी ४ पोलीस कर्मचार्‍यांचे निलंबन करण्यात आले. दयानंद गायकवाड, संतोष आंदुरे, तुकाराम पांढरे आणि राजेश दराडे अशी निलंबित केलेल्या पोलिसांची नावे आहेत. (जनतेचे रक्षण करणार्‍या पोलिसांनी पोलीस ठाण्यामध्ये चोरी करणे, हे गंभीर आहे. या प्रकरणाचे सखोल अन्वेषण करून संबंधितांवर कडक कारवाई करणे आवश्यक ! – संपादक)

लोणी काळभोर पोलीस ठाण्यात बाळासाहेब घाडगे या चोराला अटक केली होती. या चोराकडे अधिक चौकशी केली असतांना वरील गोष्टी उघडकीस आली होती. पोलीस कर्मचार्‍यांनी या गाड्या खराब आहेत, असे सांगून दुचाकी गाड्यांची विक्री करण्यास भाग पाडले.