सातारा येथील धर्मप्रेमी कु. लीना सावंत हिची धनुर्विद्या स्पर्धेसाठी निवड !

कु. लीना सावंत

सातारा, २८ जानेवारी (वार्ता.) – नागेवाडी येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने प्रशिक्षणवर्ग घेण्यात येतो. या वर्गातील प्रशिक्षणार्थी कु. लीना रघुनाथ सावंत हिची ‘धनुर्विद्या’ या क्रीडा प्रकारात शिवाजी विद्यापिठाच्या संघात अखिल भारतीय आंतर विद्यापीठ स्पर्धेसाठी निवड झाली आहे. या यशाविषयी कु. लीना हिच्यावर सर्व स्तरांतून कौतुकाचा वर्षाव होत आहे.

पंजाब येथील भटिंडा येथे चालू असलेल्या अंतर विद्यापीठ दक्षिण विभाग धनुर्विद्या क्रीडा प्रकारात कु. लीनाची निवड झाली आहे. या यशाचे श्रेय कु. लीना हिने समितीचे प्रेरणास्थान सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले, कुटुंबीय आणि प्रशिक्षक प्रवीण सावंत यांना दिले आहे. या यशाविषयी कु. लीना म्हणाली, ‘‘मी प्रतिदिन साधना करते. याचा लाभ मला प्रशिक्षण करतांना जाणवतो. मी स्पर्धेपूर्वी ‘गणपतिस्तोत्र’ आणि ‘मारुतिस्तोत्र’ न विसरता म्हणते. त्यामुळे माझ्यामध्ये एक वेगळीच ऊर्जा निर्माण झाल्याचे मला जाणवते, तसेच मी दैनंदिन कृतीस प्रारंभ करतांना प्रार्थना आणि कृती पूर्ण झाल्यानंतर न विसरता श्री गुरुचरणी कृतज्ञता व्यक्त करते. स्पर्धा चालू असतांना माझा नामजप सतत चालू असतो. मी गतवर्षीही अंतर विद्यापीठ स्पर्धेत खेळले होते. आता आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत खेळण्याचा माझा मानस असून तशी सिद्धता चालू आहे.’’