श्री रामललाची मूर्ती बनवणारे योगीराज यांच्या पत्नीने दिली माहिती
म्हैसुरू – अयोध्येत श्रीराममंदिरात प्राणप्रतिष्ठेसाठी निवडलेली श्री रामललाची मूर्ती बनवणारे मूर्तीकार अरुण योगिराज यांना ही मूर्ती बनवण्यासाठी ६ महिने लागले. या ६ महिन्यांत ते ऋषीसारखे जीवन जगले. या ६ महिन्यांत त्यांनी सात्त्विक आहार घेतला. या काळात त्यांनी फळे आणि मोड आलेले धान्य ग्रहण केले, असे मूर्तीकार अरुण योगिराज यांच्या पत्नी विजेता यांनी सांगितले. ‘आमच्या कुटुंबासाठी हा अभिमानाचा क्षण आहे’, असेही त्या म्हणाल्या.
(सौजन्य : India Today)
१. शिल्पकारांच्या कुटुंबातील पाचव्या पिढीतील अरुण योगिराज यांनी वयाच्या ११ व्या वर्षी कोरीव काम करणे चालू केले आणि तेव्हापासून ते त्यांच्या कुटुंबाच्या समृद्ध परंपरेचे घटक बनले.
२. ‘अरुण खूप प्रतिभावंत आहेत. त्यांच्या कलेची जगभरात ओळख होईल आणि त्यांचे कौतुक होईल’, अशी आम्हाला आशा होती, असे विजेता यांनी सांगितले.
३. अरुण योगिराज यांनी बनवलेल्या मूर्तीचे वर्णन करतांना त्या म्हणाल्या, ‘‘श्री रामललाची सुंदर मूर्ती दैवी अस्तित्व दर्शवते. श्री रामलला अयोध्येत परतले आहेत, असा साक्षात्कार मूर्ती पाहून होतो.’’
४. संपूर्ण देशभरातील लोकांकडून मिळालेल्या प्रेम आणि आशीर्वाद यांविषयी विजेथा यांनी कृतज्ञता व्यक्त केली. या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानंतर अयोध्येला भेट देणार असल्याचे त्यांनी सांगितले.