पणजी : गोवा औद्योगिक विकास महामंडळाने वेर्णा औद्योगिक वसाहतीमधील एकूण २ लाख ३९ सहस्र चौरस मीटर क्षेत्रफळातील १६ भूखंडांचा ई-लिलाव घोषित केला आहे. गोवा औद्योगिक विकास महामंडळाने वेर्णा औद्योगिक वसाहतीमध्ये उद्योग व्यवसायांच्या स्थापनेसाठी भूमी भाडेपट्टीवर देण्यासाठी हा ई-लिलाव घोषित केला आहे. १३ मार्च ते १५ मार्च २०२४ या कालावधीत NICeAuction पोर्टल https://eauction.gov.in वर ई-लिलाव केला जाईल.
भूखंडांचे आकार १ सहस्र चौरस मीटर ते ४२ सहस्र ३०० चौरस मीटरपर्यंत आहेत.
भूखंडाची वार्षिक भाडेपट्टी अनुदानित दराने निश्चित केलेली आहे. इच्छुकांना भूखंडांच्या हप्त्यावर बोली (खरेदीची पद्धत) लावायची आहे, असे लिलावाच्या नोटिसीमध्ये नमूद केले आहे. माहिती तंत्रज्ञान/माहिती तंत्रज्ञानाशी संबंधित सेवा, लॉजिस्टिक्स (मालवाहतूक आणि साठा करण्याची सेवा) आणि गोदाम यांना उद्योग म्हणून मान्यता मिळाल्यामुळे, तसेच नवीन गोवा औद्योगिक विकास नियम २०२३ द्वारे व्यवसाय करणे अधिक सुलभ होते. यामुळे या वेळी औद्योगिक वसाहतीमधील भूखंडांच्या ई-लिलावासाठी लक्षणीय बोली असण्याची शक्यता आहे.