कास परिसरातील भूमींवर अनधिकृत बांधकाम केल्यास संबंधितांवर कारवाई करणार ! – जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी

जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी

सातारा, ११ जानेवारी (वार्ता.) – जिल्ह्यातील कास पठार परिसरातील अनधिकृत बांधकामाविषयी राष्ट्रीय हरीत लवाद (पश्चिम विभाग) यांच्याकडे अर्ज प्रविष्ट करण्यात आला होता. या अर्जाच्या अनुषंगाने ४ डिसेंबर २०२३ या दिवशी न्यायालयाने सातारा जिल्हाधिकारी, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ पर्यावरण वातावरणीय बदल विभाग, सातारा उपवनसंरक्षक आणि महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ यांची समिती स्थापन करण्याचे आदेश दिले होते. या अनुषंगाने जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी समिती स्थापन करून या समितीची आढावा बैठक घेतली.

कास परिसरातील भूमीधारकांनी कोणत्याही प्रकारचे अनधिकृत बांधकाम करू नये; अन्यथा संबंधितांविरुद्ध कायदेशीर कारवाई करू, असे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिले आहेत.

जिल्हाधिकारी डुडी पुढे म्हणाले, ‘‘न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे समितीने अतिक्रमण केलेल्या जागांची प्रत्यक्ष पहाणी करायची आहे. या वेळी ‘महाराष्ट्र नगररचना अधिनियम १९६६’ मधील तरतूदींचे उल्लंघन झाले आहे किंवा नाही, याची पहाणी करून अहवाल सादर करायचा आहे. यानिमित्त १६ जानेवारी या दिवशी कास परिसराच्या समितीच्या वतीने पहाणी करण्यात येणार आहे.