फसवणार्या बांधकाम व्यावसायिकांवर गुन्हा नोंदवणार !
पुणे – आंबेगाव बुद्रुक येथील विनाअनुमती बांधलेल्या ११ इमारतींवर महापालिकेच्या बांधकाम विकास विभागांकडून कारवाई करण्यात आली. त्या पार्श्वभूमीवर विनाअनुमती बांधकामांना दिलेल्या नोटिसा आणि त्यांवर केलेल्या कारवाईचा अहवाल महापालिका आयुक्त आणि प्रशासक विक्रम कुमार यांनी मागवला आहे. त्यासाठी नगर अभियंता आणि अतिरिक्त आयुक्त यांची समिती स्थापन करण्यात आली आहे. ही समिती १२ जानेवारीपर्यंत अहवाल सादर करणार आहे.
११ इमारतींना नोटीस पाठवून समयमर्यादेत कारवाई केली नाही; म्हणून गेल्या ३ वर्षांतील विनाअनुमती बांधकामांना देण्यात आलेल्या नोटिसींची माहिती मागवण्यात आली असल्याचे विक्रम कुमार यांनी सांगितले. तसेच सदनिकाधारकांची फसवणूक करणार्या बांधकाम व्यावसायिकांवर महापालिकेकडून गुन्हेही नोंदवण्यात येणार आहेत. ‘सदनिका खरेदी करताना ‘रेरा’ आणि महापालिका संकेतस्थळांवरून बांधकामाला अनुमती आहे का ? याची खात्री करून घ्यावी’, असे आवाहन आयुक्तांनी केले आहे.
संपादकीय भूमिका :हा आढावा घेण्यास ३ वर्षे का लागली ? इतकी वर्षे प्रशासन झोपा काढत होते का ? त्या त्या वेळीच हा आढावा का घेतला नाही, याचेही कारण आयुक्तांनी सांगावे ! |