नववर्षाच्या निमित्ताने पुणे मेट्रोच्या प्रवासी सेवेचा विस्तार !

प्रवाशांसाठी पहिल्या टप्प्याची संपूर्ण मार्गिका लवकरच खुली होणार !

प्रतिकात्मक चित्र

पुणे – पुणे मेट्रोच्या पहिल्या टप्प्यातील मार्गिका १ (पिंपरी-चिंचवड महानगरपालिका ते स्वारगेट) आणि मार्गिका २ (वनाज ते रामवाडी) मिळून एकूण २४ कि.मी. मार्गावर प्रवासी सेवा चालू झाली आहे. उर्वरित ९ कि.मी. मार्गाचे काम पूर्णत्वाकडे आले असून लवकरच पुणे मेट्रोची पहिल्या टप्प्यातील संपूर्ण मार्गिका प्रवाशांसाठी खुली करण्यात येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते गेल्या वर्षी १ ऑगस्टला पुणे मेट्रोच्या गरवारे महाविद्यालय स्थानक ते रूबी हॉल क्लिनिक स्थानक आणि फुगेवाडी स्थानक ते सिव्हिल कोर्ट इंटरचेंज स्थानक या मार्गांचे लोकार्पण झाले. त्यानंतर या मार्गावर प्रवासी सेवेचा विस्तार झाला. प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेऊन महामेट्रोने नवीन वर्षात पुणे मेट्रोच्या प्रवासी सेवेचा विस्तार करण्याची घोषणा केली आहे.

या आधी दिवसभरात मार्गिका १ वर ८१ फेर्‍या होत होत्या, तर १ जानेवारी २०२४ पासून ११३ फेर्‍या होतील. मार्गिका २ वरील फेर्‍यांची संख्या ८० वरून १११ पर्यंत वाढणार. गर्दीच्या वेळात मार्गिका १ आणि २ वर ६ मेट्रो ट्रेन कार्यान्वित होत्या. आता ८ मेट्रो ट्रेन कार्यान्वित होतील. अल्प गर्दीच्या वेळात मार्गिका १ आणि २ वर ४ ऐवजी ६ मेट्रो ट्रेन कार्यान्वित होणार आहेत.

व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर यांनी सांगितले की, नवीन वर्षात प्रवासी सेवेच्या विस्तारामुळे मेट्रोच्या प्रवासी वेळेत अधिकाधिक लोकांना प्रवास करणे शक्य होणार आहे. त्यांच्या वेळेचीही बचत होणार आहे. सकाळी आणि संध्याकाळी कार्यालयात जाण्या-येण्याच्या वेळेत होणारी गर्दी अल्प होईल.