श्रीमद्भगवद्गीतेच्या नवव्या अध्यायाच्या चिंतनाने भगवंताची निश्चित प्राप्ती ! – ह.भ.प. निळकंठ महाराज देशमुख

ह.भ.प. निळकंठ महाराज देशमुख

नगर – भगवंताला ओळखता आले पाहिजे. सत्ययुगात ज्ञान, त्रेतायुगात ध्यान, द्वापारयुगात उपासना आणि कलीयुगात नामस्मरण सर्वश्रेष्ठ आहे. ज्ञानाचा संबंध बुद्धीशी, ध्यानाने मन स्थिर होते. शरिराने साथ दिली, तरच उपासना घडते. मनाने ठरवले तरच नामस्मरण साधते. भगवंताची भक्ती कशी केली पाहिजे ? हे श्रीमद्भगवद्गीतेतील नववा अध्याय सांगतो. श्रीमद्भगवद्गीतेच्या नवव्या अध्यायाच्या चिंतनाने भगवंताची प्राप्ती निश्चित होते, असे ह.भ.प. निळकंठ महाराज देशमुख यांनी सांगितले. येथील दिल्लीगेट जवळील श्री नाना महाराज मंदिरात आयोजित करण्यात आलेल्या २३१ व्या अखंड हरिनाम सप्ताहामध्ये श्रीमद्भगवद्गीता या विषयावर ते बोलत होते. मंदिराच्या वतीने श्री. भगवान देशमुख आणि सनदी लेखापाल (सी.ए.) श्री. संजय देशमुख यांनी त्यांना सन्मानित केले.

श्रीमद्भगवद्गीतेच्या नवव्या अध्यायावर सलग दोन दिवस झालेली ह.भ.प. निळकंठ महाराज देशमुख यांची सुश्राव्य प्रवचने भाविकांना आत्मचिंतनास भाग पाडणारी ठरली.

ह.भ.प. निळकंठ महाराज देशमुख पुढे म्हणाले, ‘‘गोकुळात गवळ्यांच्या मुलांसोबत गायी चरायला नेणारे, अर्जुनाच्या रथाचे सारथ्य करणारे भगवान श्रीकृष्ण आपले काम निष्ठेने करण्याचा कृतीशील संदेशच देतात. भक्ती करतांना आपले मन भगवंताला अर्पण करावे. भगवंताची पूजा करतांना-आरती करतांना-नैवेद्य दाखवतांना आपला भाव महत्त्वाचा आहे. आपण अनन्यभावाने भगवंताची सेवा करतांना आपल्या डोळ्यांत आलेले आनंदाश्रू भगवंताला आवडतात “.