श्रीमन् महासाधू श्री मोरया गोसावी महाराज संजीवन समाधी महोत्सव २९ डिसेंबरपासून !
चिंचवड (जिल्हा पुणे) – श्रीमन् महासाधू श्री मोरया गोसावी महाराज संजीवन समाधी महोत्सव २९ डिसेंबर २०२३ ते २ जानेवारी २०२४ या कालावधीत चिंचवड येथे साजरा होणार आहे. या निमित्ताने चिंचवड देवस्थान ट्रस्ट, पिंपरी-चिंचवड महापालिका आणि चिंचवड ग्रामस्थ यांच्या वतीने धार्मिक कार्यक्रम, सुगम संगीत अन् व्याख्यान, आरोग्य आणि रक्तदान शिबिरांसह विविध समाजोपयोगी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. याविषयीची माहिती ट्रस्टचे मुख्य विश्वस्त मंदार महाराज देव यांनी २५ डिसेंबर या दिवशी पत्रकार परिषदेत दिली. ‘श्री मोरया गोसावी महाराज जीवनगौरव’ पुरस्कार अभिनेते प्रशांत दामले यांना देण्यात येणार आहे.
सोहळ्याचे हे ४७२ वे वर्ष आहे. महोत्सवाचे उद्घाटन, तसेच चिंचवड देवस्थानच्या इंग्रजी भाषेतील संकेतस्थळाचे लोकार्पण श्री भगवान गढ संस्थानचे प्रमुख विश्वस्त न्यायाचार्य महंत डॉ. नामदेव शास्त्री महाराज यांच्या हस्ते २९ डिसेंबरला होईल.
२९ डिसेंबर ते २ जानेवारी या कालावधीत होणार्या कार्यक्रमांची रूपरेषा !
१. महोत्सवानिमित्त २९ डिसेंबर ते २ जानेवारी या कालावधीत प्रतिदिन सनई-चौघडा वादन, श्री मोरया गोसावी चरित्र पठण, लक्ष्मी-विनायक याग, रक्तदान शिबिर, नेत्र आणि दंत चिकित्सा आणि आरोग्य शिबिर होईल.
२. २९ डिसेंबरला संजीवन समाधी महोत्सवाचे उद्घाटन, व्याख्यान, तसेच गायनाचा कार्यक्रम होईल.
३. ३० डिसेंबरला ‘सोहम् योग साधना वर्गा’चे शिबीर, सामूहिक अथर्वशीर्ष पठण, सामूहिक अभिषेक, नेत्र आणि दंत चिकित्सा, भजन-कीर्तन, व्याख्यान आणि अभंगवाणी यांचा कार्यक्रम होणार आहे.
४. ३१ डिसेंबरला आरोग्य आणि दंत चिकित्सा शिबीर, भजन-कीर्तन, व्याख्यान आणि गीतरामायणचा कार्यक्रम असेल.
५. १ जानेवारीला ‘श्री मोरया गोसावी महाराज जीवन चरित्र’ दशावतारी नाट्याच्या माध्यमातून सादर करण्यात येणार आहे.
६. २ जानेवारीला मोरया गोसावी महाराज संजीवन समाधीची महापूजा होईल. तसेच सनई-चौघडा वादन, त्यानंतर श्री मोरया गोसावी संजीवन समाधी मंदिरावर पुष्पवृष्टी होईल. तसेच कीर्तन, श्री मोरया गोसावी महाराज चरित्र पठण होईल. महाप्रसाद आणि श्री मोरया गोसावी संजीवन समाधी मंदिरात भव्य आतषबाजी आणि चिंचवड येथील ‘स्वराज्य ढोलताशा पथका’ची मानवंदना होईल. रात्री श्री मोरया गोसावी संजीवन समाधी समोर धुपारती आणि त्यानंतर श्री मंगलमूर्ती वाडा येथे धुपारती होईल. त्यानंतर महोत्सवाची सांगता होईल. ‘या सर्व धार्मिक कार्यक्रमांना गणेशभक्तांनी उपस्थित रहावे’, असे आवाहन विश्वस्त मंडळाने केले आहे.