पुणे, २४ डिसेंबर (वार्ता) – सनातन संस्था ही मागील काही वर्षांपासून शाळांमध्ये प्रबोधन करत असून त्याला उत्तम प्रतिसाद मिळत आहे. यातूनच काही शाळा कार्यातही सहभागी होत आहेत. शाळेतील विद्यार्थी धर्माचरण करत आहेत, साधनेसाठी प्रयत्न करत आहेत. सनातन संस्थेने ‘समाजाचा सर्वांगीण उत्कर्ष साधता यावा’ यासाठी अनेक ग्रंथ निर्माण केले आहेत. सामाजिक उपक्रमांच्या माध्यमांतून आध्यात्मिक ज्ञानदानाची सेवा व्हावी, या उद्देशाने नुकतेच चक्रपाणी वसाहत, भोसरी येथील ‘श्रीराम विद्यालय’ या शाळेत सनातन संस्था-निर्मित ग्रंथ भेट देण्यात आले. यामध्ये अग्नीशमन प्रशिक्षण, औषधी वनस्पतींची लागवड कशी करावी ?, भोजनापूर्वीचे आचार, आनंद प्राप्तीसाठी अध्यात्म यांसारख्या २२ हून अधिक विविध प्रकारच्या ग्रंथांचा समावेश आहे. हे ग्रंथ शाळेचे मुख्याध्यापक श्री. जगदाळे यांनी स्वीकारले.
या ग्रंथांच्या माध्यमांतून विद्यार्थ्यांना ‘अभ्यासाला अध्यात्माची जोड कशी द्यावी’, तसेच ‘व्यक्तिमत्त्व विकास कसा करावा’ याविषयी लाभ होऊन आनंदी आणि ताणविरहित जीवन जगणे सुलभ होईल, तसेच या ग्रंथांमुळे विद्यार्थ्यांना आपली संस्कृती आणि परंपरा यांची माहिती होणार आहे
या वेळी मुख्याध्यापक श्री. जगदाळे म्हणाले, ‘‘तुम्ही ग्रंथ पुष्कळच सुंदर दिले आहेत. तुम्ही जे कार्य करत आहात, ते पुष्कळच छान आहे. आता त्याची समाजाला आवश्यकता आहे. तुम्ही करत असलेले हे कार्य कौतुकास्पद आहे. माझ्याकडून जे सहकार्य हवे, ते मी जरूर करेन. हे सर्व ग्रंथ मी शाळेतील वाचनालयात ठेवीन. सर्व ग्रंथ प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत जातील, असाही प्रयत्न करेन.’’