२६ डिसेंबर ते १२ जानेवारीपर्यंत कोल्हापूर-सांगली या मार्गावरील सर्व ‘पॅसेंजर’ गाड्या रहित !
मिरज – रेल्वेमार्गाचे दुहेरीकरण आणि ‘इंटरलॉकिंग’च्या कामासाठी मिरज ते पुणे अन् मिरज ते घटप्रभा या मार्गावर रेल्वेच्या वतीने ‘मेगाब्लॉक’ घेण्यात येणार आहे. त्यामुळे २६ डिसेंबर २०२३ ते १२ जानेवारी २०२४ पर्यंत कोल्हापूर-सांगली, तसेच मिरज ते कुर्डुवाडी या मार्गावरील सर्व ‘पॅसेंजर’ (डेमू) गाड्या रहित करण्यात आल्या आहेत, तसेच कोल्हापूर ते पुणे या मार्गावर रात्री धावणारी ‘सह्याद्री एक्सप्रेस’ गाडी २६ डिसेंबर ते ९ जानेवारीपर्यंत आणि १२ ते १४ जानेवारीपर्यंत रहित करण्यात आली आहे, अशी माहिती ‘रेल्वे कृती समिती’चे अध्यक्ष श्री. मकरंद देशपांडे आणि क्षेत्रीय सल्लागार सदस्य श्री. सुकुमार पाटील यांनी कळवली आहे. हे निवेदन प्रवाशांच्या सोयीसाठी देण्यात आले आहे.
मिरज ते लोंढा आणि ‘कॅसलरॉक’ पर्यंत धावणार्या गाड्या या घटप्रभापर्यंत येतील आणि तेथूनच परत जातील. २६ डिसेंबर ते १२ जानेवारी या कालावधीत धावणार्या बेंगळूरू ते अजमेर, जोधपूर, गांधीधाम या गाड्या २ दिवस अन्य मार्गे वळवण्यात आल्या असून इतर दिवशी १ ते २ घंटे विलंबाने धावणार आहेत. कोल्हापूर ते मुंबई ‘महालक्ष्मी एक्सप्रेस’ आणि कोल्हापूर-मुंबई ‘कोयना एक्सप्रेस’ या गाड्या चालू रहाणार आहेत. धनबाद ते कोल्हापूर आणि नागपूर ते कोल्हापूर या साप्ताहिक गाड्या पंढरपूरपर्यंतच येतील आणि पंढरपूर येथून सुटणार आहेत. या कामामुळे प्रवाशांना होणार्या त्रासाबद्दल रेल्वे प्रशासनाकडून दिलगिरी व्यक्त करण्यात आली आहे.