चिंचवड (पुणे) येथील जैन विद्या प्रसारक मंडळाच्या सी.बी.एस्.इ. संलग्न शाळेची कौतुकास्पद कृती !

इंग्रजी माध्यमाची शाळा असूनही नेहमीच धर्माचरणाच्या कृतींना प्रोत्साहन !

चिंचवड (जिल्हा पुणे), २१ डिसेंबर (वार्ता) – येथील ‘रसिकलाल एम् धारिवाल इंटरनॅशनल स्कूल’ ही शाळा इंग्रजी माध्यमाची असूनही नेहमीच धर्माचरणाच्या कृतींना प्रोत्साहन देत असते. शाळेमध्ये तिलक महोत्सवासारखे उपक्रम राबवले जातात, तसेच विद्यार्थी-विद्यार्थिनींना कुंकू, तसेच टिळा लावण्यासाठी प्रोत्साहन दिले जाते. या शाळेने या वर्षीच्या वार्षिक स्नेहसंमेलनाच्या कार्यक्रमामध्ये पालकांना सहभागी होण्यासाठी ‘एंट्री पास’ दिले आहेत. त्यावर सूचना लिहिली आहे की, कार्यक्रमाला येतांना भारतीय पोशाख घालून यावे, तसेच कपाळावर कुंकू किंवा टिळा लावावा. या ‘एन्ट्री पास’वर असलेल्या श्रीविष्णूच्या चित्राचा अवमान होऊ नये यासाठी हे देवाचे चित्र श्रद्धेने स्वतःजवळ ठेवावे आणि उपयोग झाल्यानंतर जलामध्ये विसर्जन करावे किंवा शाळेला परत द्यावे. धर्माचरण करण्यासाठी विद्यार्थी-विद्यार्थिनी, तसेच त्यांचे पालक यांना उद्युक्त करणे, तसेच देवतांचा अवमान होऊ नये यासाठीही कृतीशील प्रयत्न करणे, हे शाळेचे प्रयत्न खरोखरच कौतुकास्पद आहेत.

संपादकीय भूमिका

धर्माचरणाच्या कृतींना प्रोत्साहन देणार्‍या या शाळेचा आदर्श इतरही शाळांनी घेतल्यास विद्यार्थ्यांवर सुसंस्कार होतील आणि त्यांना हिंदु संस्कृतीचे महत्त्व लक्षात येईल !