मोशी (जिल्हा पुणे) – मैला शुद्धीकरण केंद्र बंद असलेल्या ४१ सोसायटीधारकांची नळजोडणी तोडण्याची चुकीची कारवाई महापालिकेने चालू केली आहे. ही कारवाई थांबवा अन्यथा तीव्र आंदोलन छेडू अशी चेतावणी चिखली, मोशी, पिंपरी-चिंचवड हाऊसिंग सोसायटी फेडरेशनचे अध्यक्ष संजीवन सांगळे यांनी महापालिकेला दिली आहे. चुकीचा अहवाल देणार्या महापालिकेचे संबंधित अधिकारी आणि विकासक यांवरही कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे. आयुक्त शेखर सिंह यांच्या समवेत पत्रव्यवहार करून या गोष्टीला त्यांनी विरोध दर्शवला होता. सहकारी गृहरचना संस्थांनी मैला शुद्धीकरण केंद्र बसवतांना संबंधित सर्व ४१ सोसायट्यांच्या विकासकांनी या यंत्रणा निकृष्ट दर्जाच्या बसवल्या आहेत. सोसायटी हस्तांतरण करतांना कोणत्याही प्रकारची सोसायटीधारकांची संमती घेतली नाही, असे फेडरेशनने दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे.
महापालिकेने मैला शुद्धीकरण प्रकल्प पहाणी करण्यासाठी नेमलेल्या खासगी ठेकेदारांच्या कर्मचार्यांनी सर्वेक्षण व्यवस्थित केले नाही. संबंधित गोष्टीची चौकशी करून निर्णय घ्यावा, असे सांगूनही सोसायटीची नळजोडणी तोडण्याची मोहीम चालू केली आहे. त्यामुळे विकासक, बांधकाम विभागाचे अधिकारी यांच्यावर कारवाई करावी. फेडरेशनच्या पदाधिकार्यांची बैठक घेऊन तक्रारीची शहानिशा करावी. मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत ही मोहीम स्थगित करावी अन्यथा फेडरेशन आंदोलन करेल, असे त्यांनी म्हटले आहे.