आजपासून नगर शहरातील नाना महाराज मंदिरात २३१ वा अखंड हरिनाम सप्ताह

२० ते २७ डिसेंबर या कालावधीत अनेक कार्यक्रमांचे आयोजन

प.पू. नाना महाराजांची समाधी

नगर – येथील दिल्लीगेट जवळील श्री नाना महाराज मंदिरात प्रतिवर्षीप्रमाणे आयोजित करण्यात आलेला २३१ वा अखंड हरिनाम सप्ताह २० ते २७ डिसेंबर या कालावधीत साजरा होणार असून याची जय्यत सिद्धता करण्यात आली आहे, अशी माहिती श्री. भगवान देशमुख आणि सीए (सनदी लेखापाल) श्री. संजय देशमुख यांनी दिली. २७ डिसेंबरला दुपारी १२ ते ४ या वेळेत महाप्रसाद कार्यक्रमाने या अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता करण्यात येईल. नगर शहर आणि उपनगरातील भाविकांनी या सप्ताहातील सर्व कार्यक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन देशमुख परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे.

श्री. संजय देशमुख म्हणाले, ‘‘आमच्या घराण्यातील साक्षात्कारी तत्त्ववेत्ते संत श्री नाना महाराज यांनी शके १७८४ (रथसप्तमी, इसवी सन १८६२) मध्ये येथे संजीवन समाधी घेतली. त्यांचे सुपुत्र श्री. नरहरीबुवा यांनी सुबक समाधी मंदिर उभारले. श्री नाना महाराज हे निस्सीम विठ्ठल भक्त होते. त्यांनी चालू केलेला अखंड हरिनाम सप्ताह या वर्षी २३१ वे वर्ष पूर्ण करत आहे. शहरात इतकी वर्षे विनाखंड चाललेला हा एकमेव हरिनाम सप्ताह असून तो देशमुख परिवार श्रद्धेने अन् निष्ठेने चालवत आहे. हे अत्यंत दुर्मिळ आणि कौतुकास्पदच आहे. खासगी मालकीच्या या मंदिरात नाना महाराजांचे वंशज गुण्यागोविंदाने नांदत आहेत. श्री नाना महाराजांनी लिहिलेले ३०० स्फूट अभंग, सौरी इ. रचना आणि श्रीविवेक सुदर्शन हा ३०० अध्यायांचा ८ सहस्र ५०० ओव्यांचा हस्तलिखित ग्रंथ मंदिरात उपलब्ध आहे.’’

नामसप्ताहाचा शुभारंभ २० डिसेंबरला सकाळी ९ वाजता श्री. भगवान देशमुख यांच्या हस्ते विधीवत् पूजनाने होईल. २० ते २६ डिसेंबर या कालावधीत प्रतिदिन सकाळी ८ ते ११ या वेळेत श्री गुरुचरित्र पारायण होईल. दुपारी ४ ते सायंकाळी ६ या वेळेत महिला भजनी मंडळांच्या भजनांचे कार्यक्रम पार पडतील, तर रात्री १० ते १२ या वेळेत पुरुषांच्या भजनी मंडळांची भावमधुर भजने होतील. प्रतिदिन सायंकाळी ६ ते ७ या वेळेत प्रवचन आणि हरिपाठ सोहळा पार पडेल. २२ डिसेंबरला सकाळी ११ ते दुपारी १ या वेळेत सामूहिक गीता वाचनाचा कार्यक्रम मुक्ताई भजनी मंडळ करेल. २४ डिसेंबरला दुपारी २ ते ४ या वेळेत ‘राधे राधे भजनी मंडळा’चे भजन होईल. सप्ताह कालावधीत सायंकाळी ६ ते ७ या वेळेत प्रवचन आणि हरिपाठ सोहळा पार पडेल. या वेळेत २३ डिसेंबरला श्री. मिलिंद चवंडके यांचे ‘नर्मदा परिक्रमा -एक दिव्य अनुभूती’ आणि २४ डिसेंबरला ‘नाथांचा वारकरी संप्रदाय’ या विषयावर प्रवचन होणार आहे. अन्य दिवशीही या वेळेत वेगवेगळ्या विषयावर अन्य मान्यवरांचे प्रवचन होणार आहे.