विधान परिषदेतून…
विरोधकांनी क्षमा मागण्याची मागणी
नागपूर – कुख्यात आतंकवादी दाऊद इब्राहिमच्या नातेवाइकांच्या विवाहात मंत्री गिरीश महाजन सहभागी झाल्याचा विरोधकांनी केलेला आरोप पूर्णतः खोटा आहे. त्यामुळे एखाद्या मंत्र्यावर बेछूट आरोप केल्याप्रकरणी विरोधकांनी क्षमा मागायला हवी, असे स्पष्ट मत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी १८ डिसेंबर या दिवशी विधान परिषदेत व्यक्त केले.
१. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आणि शरद पवार गटाचे आमदार एकनाथ खडसे यांनी नियम २८९ अन्वये प्रस्ताव मांडत मंत्री गिरीश महाजन हे दाऊद इब्राहिमच्या नातेवाइकांच्या विवाहात सहभागी झाल्याचा आरोप केला.
२. या संदर्भातील छायाचित्रे त्यांनी सभागृहात सादर केली, तसेच त्यांनी तात्काळ त्यागपत्र द्यावे, अशीही मागणी केली; मात्र भाजपचे गटनेते प्रवीण दरेकर यांनी त्यावर आक्षेप घेतला. २८९ अन्वये चर्चेचा एकच प्रस्ताव विरोधी पक्षनेते, एकनाथ खडसे आणि अनिल परब अशा तिघांनी मांडला आहे. याचा अर्थ हे सगळे रेकॉर्डवर आणण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. सभागृहाचे कामकाज अशा प्रकारे होत नाही. मंत्र्याचे नाव घ्यायचे असेल, तर आधी नोटीस द्यावी लागते. त्यांनी असे काही केलेले नाही. त्यामुळे हे सगळे कामकाजातून काढून टाका, अशी मागणी त्यांनी केली. त्यावर मंत्र्यांचे नाव आणि इतर सर्व गोष्टी कामकाजातून वगळल्या जातील, अशी निश्चिती उपसभापती डॉ. नीलम गोर्हे यांनी दिली.
३. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरिषदेत निवेदन सादर करत विरोधकांचे आरोप खोडून काढले. ते म्हणाले की, गिरीश महाजन ज्या विवाहात गेले होते, तो विवाह नाशिकमधील मुसलमान धर्मगुरु शहर-ए-खातिब यांच्या पुतण्याचा होता.
४. गिरीश महाजन हे तेथे पालकमंत्री म्हणून गेले होते. शहर-ए-खातिब किंवा तेथील अन्य कुणाचाही दाऊदशी संबंध नाही. ज्या मुलीशी विवाह झाला, त्यांचाही दाऊदशी संबंध नाही. संबंधित विवाहानंतर माध्यमांमध्ये अशा प्रकारचे आरोप झाल्यामुळे वर्ष २०१७-१८ मध्ये मी गृहमंत्री म्हणून पोलीस उपायुक्तांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नेमली होती. या चौकशी समितीने आपल्या अहवालात स्पष्टपणे नमूद केले आहे की, शहर-ए-खातिब यांचा दाऊदशी कुठलाही संबंध नाही.
५. ‘शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे विधान परिषदेत आल्यामुळे अशा प्रकारचे विषय आले असतील; पण निश्चिती न करता एका मंत्र्यावर आरोप करण्यात आले. अशा प्रकारची तडफड बडगुजर, सलीम कुत्तासमवेत नाचणार्यांसंदर्भात का दाखवली नाही ?’, अशा प्रकारे या प्रकरणावरून सभागृहात गोंधळ घालणारे ठाकरे गट, शरद पवार गट आणि काँग्रेसच्या आमदारांना उपसभापती नीलम गोर्हे यांनी सज्जड दम भरला.
६. ‘तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक प्रकरणाचा वचपा काढत आहात. उद्धव ठाकरेंसमोर बढाई मारत आहात, कारण नसतांना राजकारण चालू आहे. निराधार आरोप करून कामकाज बंद करण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यामुळे सभागृहाच्या कामकाजात व्यत्यय आणू पहाणार्यांना (सदस्य अनिल परब, भाई जगताप, विलास पोतनीस) गंभीर परिणाम भोगावे लागतील’, अशी चेतावणी त्यांनी दिली. मंत्री किंवा कुठल्याही व्यक्तीचे नाव रेकॉर्डवर ठेवले जाणार नाही. हा विधानसभेचा विषय असल्यामुळे मी २८९ चा प्रस्ताव फेटाळत आहे, असे सांगत गोर्हे यांनी सभागृहाचे कामकाज १० मिनिटांसाठी स्थगित केले.