ठाणे येथे प्रेयसीला चारचाकीची धडक देऊन घायाळ केल्याप्रकरणी प्रियकरासह तिघांविरुद्ध गुन्हा नोंद !

उच्चपदस्थ अधिकार्‍याच्या मुलाचे कृत्य !

अश्‍वजीत गायकवाड

ठाणे – महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक अनिलकुमार गायकवाड यांचा मुलगा अश्‍वजीत गायकवाड याने त्याच्या प्रेयसीला मित्रांच्या साहाय्याने चारचाकीद्वारे धडक देऊन गंभीररित्या घायाळ केले. त्याने तो विवाहित असल्याचे त्याच्या प्रेयसीपासून लपवून ठेवले होते. त्यांच्या प्रेमप्रकरणाच्या ४ वर्षांनंतर तो विवाहित असल्याचे प्रेयसीला कळाल्यानंतर प्रेयसीने त्याच्याकडे याविषयी विचारणाकेली. त्यानंतर त्याने तिच्या समवेत वरील प्रकार केला. या प्रकरणी पीडित तरुणीने दिलेल्या तक्रारीच्या आधारे कासारवडवली पोलिसांनी या गुन्ह्यात अश्‍वजीत गायकवाड, रोमिल पाटील आणि सागर साळुंखे यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. या गुन्ह्यात दुखापत करणे, दायित्वशून्यतेने वाहन चालवणे, इतरांच्या जीवितास किंवा व्यक्तीगत सुरक्षितता धोक्यात आणणार्‍या कृतीने गंभीर दुखापत पोचवणे, धमकावणे अशी कलमे लावण्यात आली आहेत. (गुन्हेगारांना कायद्याचे भय वाटत नसल्यामुळेच असे प्रकार घडत आहेत. – संपादक)

या प्रकरणी पुढील अन्वेषण कासारवडवली पोलीस ठाण्याचे पोलीस करत आहेत. सध्या पीडित तरुणीवर उपचार चालू असून तिच्या उजव्या पायाच्या गुडघ्याच्या खालचे हाड मोडले आहे, तसेच शरिराला दुखापत झाली आहे, असे पीडित तरुणीने तक्रारीत म्हटले आहे. याविषयी अश्‍वजीत गायकवाड याच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला; पण त्याची प्रतिक्रिया मळू शकली नाही. अश्‍वजीत याचे काही मित्र तरुणीला रुग्णालयात भेटून धमकी देत आहेत.

संपादकीय भूमिका

  • वडील उच्चपदावर कार्यरत असल्याने तरुणाच्या अंगी उद्दामपणा भिनल्याचे दिसून येते ! प्रेयसीला घायाळ करणार्‍या तरुणाची हिंसक मनोवृत्तीही यातून उघड होते ! अशांना कठोरात कठोर शिक्षाच व्हायला हवी !