नवी देहली – अमेरिकेत स्थायिक झालेला खलिस्तानी आतंकवादी गुरपतवंत सिंह पन्नू याच्या हत्येसाठी सरकारी अधिकार्यासमवेत कट रचल्याचा आरोप असलेल्या निखिल गुप्ता यांनी त्यांच्या कुटुंबियांच्या माध्यमातून सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. ‘भारत सरकारने अमेरिकेकडून चालू असलेल्या प्रत्यार्पणाच्या कारवाईत हस्तक्षेप करावा’, अशी मागणी यामध्ये करण्यात आली आहे. ‘निखिल गुप्ता यांना अवैधरित्या कह्यात घेण्यात आले असून त्यांच्या जिवाला धोका आहे’, असे या याचिकेत नमूद करण्यात आले आहे.
भारतीय नागरिक निखिल गुप्ता सध्या चेक प्रजासत्ताकच्या कारागृहात असून त्यांच्या प्रत्यार्पणाची अमेरिकेची विनंती तात्पुरती संमत करण्यात आली आहे. ‘निखिल गुप्ता यांनी पन्नू याला ठार मारण्यासाठी कथितरित्या एका व्यक्तीचे साहाय्य मागितले होते, ज्याला ते गुन्हेगार समजत होते; परंतु तो अंमलबजावणी प्रशासकीय विभागात हेर म्हणून कार्यरत होता’, असे अमेरिकेच्या सरकारी अधिवक्त्याने म्हटले आहे.
या आरोपांना प्रत्युत्तर देतांना भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे की, ‘‘आम्ही अशा प्रकारच्या घटनांकडे गांभीर्याने पहातो; कारण त्या आमच्या राष्ट्रीय सुरक्षेच्या हितसंबंधांवर परिणाम करतात. या प्रकरणी सरकारने एक उच्चस्तरीय अन्वेषण समिती नेमून चौकशी चालू केली आहे.’’