पुणे – शुक्ल यजुर्वेदीय माध्यंदिन महाराष्ट्रीय ब्राह्मण मध्यवर्ती मंडळाच्या वेदविद्या संवर्धन उपक्रमाच्या अंतर्गत योगीश्वर याज्ञवल्क्य वैदिक पुरस्कार वितरण सोहळा आयोजित करण्यात आला आहे. ११ डिसेंबरला सायंकाळी ५ वाजता सारसबागेजवळील वेदशास्त्रोत्तेजक सभा येथे पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे, अशी माहिती ‘वेद विद्या संवर्धन समिती’चे अध्यक्ष डॉ. रवींद्र मुळे यांनी पत्रकार परिषदेत दिली. कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून वैदिक संशोधन मंडळ, पुणेचे संचालक सुब्रह्मण्यम वेरीवेंटी आणि कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून नाशिकचे वेदाचार्य शांतारामजी भानोसे हे उपस्थित रहाणार आहेत.
पत्रकार परिषदेला अध्यक्ष विलास देशपांडे, कार्याध्यक्ष विश्राम कुलकर्णी, कार्यवाह श्रीकांत जोशी, वेदमूर्ती आहिताग्नी सुधाकरपंत कुलकर्णी आदी उपस्थित होते.
निखिल भालेराव यांना योगीश्वर याज्ञवल्क्य पुरस्कार, वेदांग शहरकर यांना ‘आदर्श छात्र पुरस्कार’ आणि ह.भ.प. बाळू कुंभार यांना ज्ञानेश्वरी प्रदान करून सन्मानित करण्यात येणार आहे. याशिवाय २२ जानेवारीला अयोध्येत पुण्यातून रामजन्मभूमी स्थळी पूजेसाठी जाणार्यांचा सत्कार करण्यात येणार असून १० वी, १२ वी आणि इतर परीक्षेत उत्तम गुण मिळवून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना पारितोषिके आणि शिष्यवृत्तीचे धनादेश वाटप होणार आहे.