ISRO Aditya L1 : सूर्याविषयी महत्त्वपूर्ण माहिती पाठवण्यास ‘आदित्य एल्-१’कडून आरंभ !

‘आदित्य-एल् १’ अवकाशयान

बेंगळुरू (कर्नाटक) – सूर्याविषयी महत्त्वपूर्ण माहिती एकत्र करण्यासाठी भारताकडून पाठवण्यात आलेल्या ‘आदित्य-एल् १’ अवकाशयानाने यशस्वीपणे काम करायला आरंभ केला आहे. त्याचे दोन्ही ‘पेलोड’ म्हणजेच यंत्र हे सूर्याविषयी समाधानकारक माहिती पाठवत आहेत.

१. ‘सोलर विंड आयन स्पेक्ट्रोमीटर’ (स्विस) आणि ‘सुप्राथर्मल अँड एनर्जेटिक पार्टिकल स्पेक्ट्रोमीटर’ (स्टेप्स) अशी या यंत्रांची नावे आहेत. या उपकरणांनी ‘सौर पवन आयन’, तसेच ‘प्रोटॉन’ आणि ‘अल्फा कण’ यांना यशस्वीरित्या मोजले आहे.

२. इस्रोने सांगितले की, या माहितीच्या माध्यमातून आपल्याला सौर वादळांविषयी पुष्कळ माहिती मिळाली आहे. यातून सौर वादळांमागील कारणे आणि त्यांचा पृथ्वीवर होणारा परिणाम यांविषयी आपल्याला माहिती मिळू शकणार आहे. या माध्यमातून अंतराळातील हवामानाविषयीही पुष्कळ माहिती समोर येऊ शकणार आहे.

३. तसे पाहिले, तर सूर्य आणि पृथ्वी यांच्यातील अंतर १५ कोटी किमी आहे आणि ‘आदित्य एल् १’ उपग्रह यातील केवळ १ टक्का अंतर कापणार आहे. असे असले, तरी सूर्याची अशी माहिती जी पृथ्वीवरून मिळू शकत नाही, ती या उपग्रहाच्या माध्यमातून मिळू शकणार आहे, असे इस्रोने सांगितले होते. या माहितीतून अन्य तारे, आकाशगंगा आणि खगोलविज्ञान यांची विविध रहस्ये अन् नियम समजून घ्यायला साहाय्य होणार आहे.