वाशी येथे २२ व्या मालमत्ता प्रदर्शनाला प्रारंभ

सनातन संस्थेच्या साधिका श्रीमती स्मिता नवलकर यांनी बी.ए.एन्.एम्.च्या सभासदांना ‘धर्मशास्त्रानुसार उद्घाटन कसे करावे ?’ याविषयीची माहिती दिली होती. त्यानुसार मान्यवरांच्या हस्ते कयपंजीने दीपप्रज्वलन करून आणि श्रीफळ वाढवून या मालमत्ता प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले.

नवी मुंबई, २ डिसेंबर (वार्ता.) – नवी मुंबईतील बांधकाम व्यावसायिकांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या २२ व्या मालमत्ता प्रदर्शनाचे उद्घाटन सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक अनिल डिग्गीकर यांच्या हस्ते १ डिसेंबर या दिवशी वाशी येथे करण्यात आले. नवी मुंबईतील बांधकाम व्यावसायिकांच्या ‘बिल्डर असोसिएशन ऑफ नवी मुंबई’ (बी.ए.एन्.एम्.) आणि ‘कॉन्फेडरेशन ऑफ रिअल इस्टेट डेव्हलपर्स असोसिएशन ऑफ इंडिया’ (क्रेडाई) यांच्या वतीने वाशी येथील सिडको प्रदर्शन केंद्रामध्ये १ ते ४ डिसेंबर या कालावधीत हे प्रदर्शन भरवण्यात आले आहे. या वेळी अभिनेत्री राकुल प्रीत सिंग, बी.ए.एन्.एम्.चे अध्यक्ष वसंत भद्रा, सचिव जिगर त्रिवेदी, भुपेंद्र शहा, शैलेश पटेल आदी उपस्थित होते.

या वेळी अनिल डिग्गीकर म्हणाले की, नवी मुंबई भविष्यात आंतरराष्ट्रीय दर्जाचे शहर होणार आहे. त्यामुळे नवी मुंबईतील घराच्या किमती आणखी वाढतील. या प्रदर्शनाच्या निमित्ताने नवी मुंबईतील नागरिकांना घर घेण्यासाठी एकाच छताखाली विविध पर्याय मिळणार आहेत. त्यामुळे नवी मुंबईत घर घेण्याचे स्वप्न असणार्‍या नागरिकांनी या प्रदर्शनाला नक्कीच भेट द्यावी, असे आवाहन त्यांनी केले. या ‘मेगा प्रॉपर्टी प्रदर्शना’मध्ये लहान-मोठ्या विकासकांनी अनुमाने ५०० गृहनिर्माण प्रकल्पांचे सादरीकरण केले आहे.

यामध्ये २० लाख ते १५ कोटी रुपयांपर्यंतची घरे ग्राहकांना एकाच छताखाली विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहेत. यात खारघर, तळोजा, पुष्पकनगर, द्रोणागिरी, उरण, खोपोली, कर्जत, उलवे, पामबीच, एन्.आर्.आय., सानपाडा, वाशी आदी गृहप्रकल्पांचा समावेश आहे.