पुणे – ससून सर्वोपचार रुग्णालयाच्या अधिष्ठाता पदावरून डॉ. संजीव ठाकूर यांना राज्य सरकारने पदमुक्त केले होते. त्याच दिवशी उच्च न्यायालयानेही डॉ. ठाकूर यांची नियुक्ती रहित करून आधीचे अधिष्ठाता डॉ. विनायक काळे यांच्या पुनर्नियुक्तीचे आदेश दिले होते. त्यानंतर डॉ. काळे हे अधिष्ठातापदाचा कार्यभार स्वीकारून लगेचच रजेवर गेले. आता अनुमाने २० दिवसांनी डॉ. काळे यांच्या तात्पुरत्या नियुक्तीचा आदेश राज्य सरकारने काढला आहे.
अमली पदार्थांच्या तस्करीचा सूत्रधार ललित पाटील पलायन प्रकरणात तत्कालीन अधिष्ठाता डॉ. ठाकूर दोषी आढळले. राज्य सरकारने डॉ. ठाकूर यांना पदमुक्त केले, तर अस्थिव्यंगोपचार विभागातील पथकप्रमुख डॉ. प्रवीण देवकाते यांना निलंबित केले. त्यामुळे अधिष्ठातापद रिक्त झाल्याने डॉ. काळे यांनी ११ नोव्हेंबरला या पदाचा कार्यभार स्वीकारला.
डॉ. विनायक काळे यांची ससूनच्या अधिष्ठातापदी नियुक्ती करण्याचा आदेश मुख्यमंत्र्यांकडून निघणे अपेक्षित होते. याविषयीचा प्रस्ताव वैद्यकीय शिक्षण विभागाने मुख्यमंत्री कार्यालयाला पाठवला होता. त्यावर अद्याप कार्यवाही झालेली नाही. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आता डॉ. काळे यांच्या तात्पुरत्या नियुक्तीचा आदेश वैद्यकीय शिक्षण विभागाचे सहसचिव शिवाजी पाटणकर यांनी काढला आहे.
संपादकीय भूमिकारुग्णालयासारख्या संवेदनशील ठिकाणी अधिष्ठातापदाचा निर्णय घेण्यास विलंब लावणारे असंवेदनशील प्रशासन ! |