बेंगळुरू (कर्नाटक) – मी विनामूल्य सेवांच्या विरोधात नाही; पण जे विनामूल्य सेवा आणि सरकारी अनुदान घेत आहेत, अशा सर्व लोकांनी याच्या मोबदल्यात समाजाच्या कल्याणात योगदान द्यावे. विनामूल्य योजना या सशर्त असायला हव्यात. प्राथमिक आणि माध्यमिक शाळांमधील उपस्थिती २० टक्के वाढली, तरच या सेवा उपलब्ध होतील, असे सरकारने लोकांना सांगावे, असे मत ‘इन्फोसिस’ आस्थापनाचे संस्थापक नारायण मूर्ती यांनी एका मुलाखतीत केले. काही दिवसांपूर्वी मूर्ती यांनी भारतीय तरुणांना आठवड्यातून ७० घंटे काम करण्याचा सल्ला दिला होता.
सौजन्य: moneycontrol
चीनच्या पुढे जाण्यासाठी वेगवान निर्णय घेण्यासह ३ पाळ्यांमध्ये काम केले पाहिजे !
नारायण मूर्ती पुढे म्हणाले की, भारतीय अर्थव्यवस्था ३.५ ट्रिलियन डॉलर्सची, तर चीनची १९ ट्रिलियन डॉलर्सच्या पुढे आहे. एकेकाळी तिथेही आपल्यासारख्या समस्या होत्या; पण चीनने त्यावर उपाय शोधून काढला आणि तो आपल्या पुढे गेला. आपण अजूनही चीनशी बरोबरी करू शकतो आणि त्याच्या पुढे जाऊ शकतो; पण त्यासाठी आपल्याला वेगवान निर्णय घ्यावे लागतील. सरकारने पायाभूत सुविधांचे प्रकल्प प्राधान्याने हाताळले पाहिजेत आणि त्यासाठी उद्योगातील लोकांना ३ पाळ्यांमध्ये काम करावे लागेल.
मुलांना इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिकवा !
मूर्ती म्हणाले की, लोक त्यांच्या मुलांना कन्नड माध्यमाच्या शाळेत पाठवत नाहीत. त्यांची मुले नेहमीच इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिकतात. त्यामुळे इंग्रजी माध्यमाच्या शाळा उघडण्याची आणि चालवण्याची प्रक्रिया सुलभ आणि विनामूल्य करण्याची आवश्यकता आहे. (मातृभाषेतून शिक्षण देणे अधिक योग्य ठरते, असे आतापर्यंत दिसून आलेले आहे. भारतियांनी भौतिक प्रगती करतांना स्वतःची संस्कृती, परंपरा आणि अस्मिताही जपणे आवश्यक आहे ! – संपादक)