मुले, स्त्रिया आणि वृद्ध लोकांविरुद्ध ‘हमास’ या आतंकवादी संघटनेच्या रानटीपणाची जागतिक भयावहता, त्यानंतर इस्रायली सैन्याने गाझावर केलेल्या आक्रमणामुळे मृत्यू आणि विनाशाच्या भयानक चित्रांनी एक कुरूप सत्य उघडकीस आणले आहे. इस्रायलने निर्माण केलेला राक्षस आता त्यालाच गिळू पहात आहे. १९८० च्या दशकात अफगाणिस्तानातील तत्कालीन सोव्हिएत युनियनच्या (आताच्या रशियाच्या) सैन्याविरुद्ध लढण्यासाठी ‘सीआयए’चे प्रशिक्षण आणि अनेक देशांतून आलेल्या पाकिस्तानमधील मुजाहिदींना (इस्लामिक पवित्र योद्धा) सशस्त्र बनवण्यामुळे प्रभावित होऊन, इस्रायलने धर्मनिरपेक्ष ‘पॅलेस्टिनी लिबरेशन ऑर्गनायझेशन’ (पी.एल्.ओ.)चे प्रतिस्पर्धी म्हणून इस्लामी हमासच्या उदयाला साहाय्य केले आणि त्याचा प्रबळ गट यासर अराफत होता.
१. राष्ट्रवादी पॅलेस्टिनी चळवळीत फूट पाडण्यासाठी इस्रायलने हमासला पाठिंबा देणे
वर्ष १९८७ मध्ये पॅलेस्टिनी भूभाग इस्रायलने कह्यात घेण्याच्या विरोधात उत्स्फूर्त निषेध आंदोलन म्हणून भडकलेली पहिली इंतिफादा, ही इस्रायलला जागृतीसाठी दिलेली धोक्याची सूचना होती. अराफत यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी पॅलेस्टिनी चळवळीत फूट पाडण्यासाठी आणि तिला कमकुवत करण्यासाठी इस्रायलने ‘पी.एल्.ओ.’विरोधी हमासला पाठिंबा दिला, जो इंतिफादाच्या प्रारंभीच्या काळात शेख अहमद यासिन या हातापायांनी अधू आणि अंशत: अंध धर्मगुरूच्या नेतृत्वाखाली स्थापन झाला होता. इस्रायलचे मूलभूत उद्दिष्ट हे इस्रायल – पॅलेस्टिनी संघर्ष सोडवण्यासाठी द्विराज्य समाधानाच्या कार्यवाहीत अडथळा निर्माण करणे होते.
२. इस्रायलच्या आर्थिक साहाय्यातूनच हमासचा प्रत्यक्षात उदय
गाझा पट्टीत कार्यरत असलेल्या इस्रायलने केलेल्या आर्थिक साहाय्यामुळे इस्लामी चळवळीतून हमास प्रत्यक्षात उदयास आला. इस्रायलचे गाझाचे गव्हर्नर ब्रिगेडियर जनरल यित्झाक सेगेव यांनी वर्ष १९८१ मध्ये हे गौप्य उघडकीला आणले की, पॅलेस्टिनी चळवळीला पॅलेस्टिनी धर्मनिरपेक्षवाद्यांचे समर्थन आणि शक्तीचा प्रतिकार करण्यासाठी त्यांना आर्थिक साहाय्य देण्यात आले होते.
वर्ष २००१ च्या शेवटच्या काळात इस्रायलमधील अमेरिकेचे राजदूत डॅनियल कुर्त्झर यांनी म्हटले होते की, इस्रायलला वाटत होते, पॅलेस्टिनी लोक राष्ट्रवादाकडे न वळता धर्माकडे वळल्यास उत्तम ! म्हणून पॅलेस्टिनी प्रांतात इस्लामी चळवळ वाढली, ज्याला इस्रायलचा पूर्ण पाठिंबा होता. सौदी अरेबियातील माजी राजदूत चार्ल्स फ्रीमनने युक्तीवाद केला की, इस्रायलने हमासला जन्म दिला. ते पुढे म्हणाले, ‘‘ती ‘शिन बेट’ची (इस्रायलची अंतर्गत गुप्तचर संस्था) कल्पना होती. तिला असे वाटत होते की, ती हमासचा उपयोग ‘पी.एल्.ओ.’चे लक्ष वेधून घेण्यासाठी करू शकतील. वर्ष २००१ च्या शेवटच्या काळात इटालियन न्यूज मॅगझिन ‘ला एक्सप्रेसो’ला सांगितले की, हमास इस्रायलच्या पाठिंब्याने निर्माण झाला होता. त्यामागे ‘पी.एल्.ओ.’ला विरोध करण्याचा उद्देश होता. इस्रायलकडून त्यांना आर्थिक साहाय्य आणि प्रशिक्षण मिळाले.’’ वर्ष २००९ मध्ये माजी इस्रायली धार्मिक व्यवहार अधिकारी अवनर कोहेन यांनी अराफतच्या शब्दांना प्रतिध्वनित करतांना म्हटले की, खेदाची गोष्ट, म्हणजे हमास ही इस्रायलची निर्मिती आहे.
इस्रायलची गुप्तचर संस्था तिने व्यापलेल्या प्रांतात ‘फूट पाडा आणि राज्य करा’, या धोरणात बराच काळ गुंतून होती. वर्ष १९९४ च्या ‘फसवणूकीची दुसरी बाजू’ या पुस्तकात एका व्हिसल ब्लोअरने (बेकायदेशीर कृत्याविषयी माहिती देणार्या व्यक्तीने) इस्रायलने हमासला साहाय्य करण्याविषयी सांगतांना म्हटले की, मूलतत्त्ववाद्यांनी चालवलेले अरब जग पश्चिमेशी कोणत्याही वाटाघाटीत सामील होणार नाही आणि पुन्हा इस्रायलला ‘एकमेव लोकशाही विचारवंत देश’ म्हणून सोडले जाईल.
३. ओसामा बिन लादेन याला ‘आतंकवादी राक्षस’ बनवण्यात अमेरिकेचा हात !
ओसामा बिन लादेन याला अमेरिकेच्या विशेष सैन्याने पाकिस्तानात ठार करण्यापूर्वी ७ वर्षांपूर्वी इस्रायलने वर्ष २००४ मध्ये हमासचा संस्थापक शेख यासिन याला क्षेपणास्त्राद्वारे आक्रमण करून ठार मारले होते; परंतु तोपर्यंत हमास आत्मघातकी बाँबर्सचा वापर करणारा पहिला इस्लामिक गट होता. तो एक अनियंत्रित ‘आतंकवादी राक्षस’ बनला होता. इस्लामवाद्यांशी इस्रायलचे गुप्त संबंध होते. ते अमेरिकेच्या सोव्हिएत युनियनविरुद्ध जिहादी वापराच्या समांतर होते. ‘सीआयए’ प्रशिक्षित मुजाहिदीन ‘अल कायदा’ आणि ‘तालिबान’ बनले. त्या वेळी ‘सेक्रेटरी ऑफ स्टेट’ हिलरी क्लिंटन यांनी वर्ष २०१० मध्ये मान्य केले की, त्यांनी त्यांना प्रशिक्षण दिले, शस्त्रसज्ज केले आणि आर्थिक साहाय्यही केले, ज्यामध्ये ओसामा बिन लादेन नावाच्या एका व्यक्तीचा समावेश होता आणि ते त्यांच्यासाठी इतके चांगले नव्हते.
अफगाणिस्तानवर आक्रमण करणार्या सोव्हिएत सैन्याविरुद्ध जिहादला चालना देण्यासाठी तत्कालीन राष्ट्राध्यक्ष रोनाल्ड रेगन यांच्या प्रशासनाने इस्लामचा वैचारिक साधन म्हणून वापर केला, तेव्हा इस्लामवादी कार्यकर्ते, गट आणि योद्ध्यांशी अमेरिकेचे त्रासदायक संबंध दृढ झाले. वर्ष १९८५ मध्ये अफगाणिस्तानातील अनेक मुजाहिदीन उपस्थित असलेल्या व्हाईट हाऊसच्या समारंभात रेगन यांनी घोषणा केली की, त्या व्यक्ती नैतिकदृष्ट्या अमेरिकेच्या संस्थापक व्यक्तींच्या तुलनेत समान होत्या.
४. इस्रायल आणि अमेरिका यांनी शत्रूच्या विरोधात राबवलेले आत्मघातकी धोरण
इस्रायलला अमेरिकेप्रमाणेच ‘माझ्या शत्रूचा शत्रू माझा मित्र’, या म्हणीप्रमाणे मार्गदर्शन िमळाले असू शकते; परंतु इतिहास सांगतो की, आपल्या शत्रूचा शत्रू मित्र होण्यापेक्षा अनेकदा उघडपणे आपल्या शत्रूमध्ये त्याचे रूपांतर होते. तरीही इस्रायल आणि अमेरिका हे दोघेही जिहादी आतंकवादाच्या पाश्चात्त्य मुळापासून योग्य धडे शिकण्यास टाळत आहेत. अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या नेतृत्वाखाली अमेरिका आणि त्याचे सहयोगी यांनी लिबियाचा नेता मुअम्मर गद्दाफीचा पाडाव केला अन् युरोपच्या दक्षिण दरवाजावर एक स्थिर जिहादी बालेकिल्ला सिद्ध केला. त्यानंतर त्यांनी सीरियाचे अध्यक्ष बशर अल-असद यांचा पाडाव करण्यासाठी एका गृहयुद्धाला चालना दिली. त्या वेळी ‘इस्लामिक स्टेट (इसिस)’चा जन्म झाला. या स्टेटचे सैनिक ‘सीआयए’चे प्रशिक्षित असदविरोधी जिहादी होते. वर्ष १९९३ च्या ‘ओस्लो १’च्या पहिल्या करारानंतर वर्ष २००५ मध्ये गाझा पट्टीतून लष्कराने माघार घेतल्यानंतरही इस्रायलचे हमासशी गुप्त संबंध होतेच. खरे तर जिहादी गटांचे दीर्घकाळ प्रायोजक असलेल्या कतारने इस्रायलच्या संमतीने वर्ष २०१२ आणि २०२१ या कालावधीत हमासला १.८ अब्ज डॉलर्स (सुमारे १५ सहस्र कोटी रुपये) दिले. इस्रायलला वाटत होते की, असा निधी देणे चालू राहिल्यानंतर हमास तत्कालीन परिस्थितीविषयी आव्हान देण्यापासून परावृत्त होईल.
५. गाझातील पॅलेस्टिनींना दूर करणे, हा इस्रायलच्या धोरणाचा भाग !
अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष जिमी कार्टर यांनी वर्ष २०१३मध्ये ‘सी.एन्.एन्.’ वृत्तवाहिनीच्या मुलाखतीत म्हटले की, ते हमास नेत्यांना कितीतरी वेळा भेटले आणि ते इस्रायलचे अस्तित्व मान्य करायला सिद्ध होते; परंतु नेतान्याहू (इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू) यांच्या ‘एक राज्य’ या हट्टापायी अर्थपूर्ण वाटाघाटीत अडथळा निर्माण झाला. नेतान्याहूने ‘लिकुड पक्षा’च्या बैठकीत सांगितले की, ‘ज्यांना पॅलेस्टिनी राज्य नको, त्यांनी हमासला प्रोत्साहन देणे आणि त्याला पैसे हस्तांतरित करणे, हे मान्य केले पाहिजे.’ गाझातील पॅलेस्टिनींना वेस्ट बँकेतील पॅलेस्टिनींपासून दूर करणे, हा त्यांच्या धोरणाचा भाग होता.
– प्रा. ब्रह्मा चेलानी, परराष्ट्र धोरणांचे विश्लेषक, नवी देहली.
प्रा. ब्रह्मा चेलानी यांचा परिचयप्रा. ब्रह्मा चेलानी हे ‘सेंटर फॉर पॉलिसी रिचर्स’ या केंद्रात ‘स्ट्रॅटेजिक स्टडीज’चे (धोरणात्मक अभ्यास) या विषयाचे प्राध्यापक आहेत. त्यांना बर्लिन (जर्मनी) येथील रॉबर्ट बॉश अकादमी ही शिष्यवृत्ती मिळाली असून त्यांनी एकूण ९ पुस्तके लिहिली आहेत. |
संपादकीय भूमिकाजिहादी आतंकवाद्यांना स्वहितासाठी साहाय्य करणे, हा आत्मघात आहे, हेच इतिहासातील अनेक घटनांतून स्पष्ट होते ! |