कोयना धरणातील ‘स्कुबा डायव्हिंग’सह (साहसी जलक्रीडा) बांबू लागवडीचा घेणार आढावा !

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सातारा जिल्हा दौर्‍यावर

सातारा, ४ नोव्हेंबर (वार्ता.) – राज्यात बांबू लागवडीची महत्त्वाकांक्षी योजना हाती घेण्यात येत आहे. सातारा जिल्ह्यात मुख्यमंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली याचा पथदर्शी प्रकल्प राबवण्यात येत आहे. या प्रकल्पासह कोयना धरणात राबवण्यात येणार्‍या ‘स्कुबा डायव्हिंग’सारख्या (साहसी जलक्रीडा) जलपर्यटन प्रकल्पांचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ४ नोव्हेंबरपासून सातारा जिल्ह्याच्या दौर्‍यावर आले आहेत.

शेतकर्‍यांना सधन बनवणारी ही योजना असून बांबू लागवड केल्यानंतर तीन वर्षांनी पडीक भूमीतून उत्पन्नाचे साधन शेतकर्‍यांसाठी निर्माण होईल. यामुळे या भागाच्या आर्थिक विकासाला हातभार लागणार आहे. हा उद्देश समोर ठेवून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यात बांबू लागवडीला प्रोत्साहन दिले आहे.

कोयना धरणाच्या ‘बॅक वॉटर’मध्ये (धरण क्षेत्रातील पाण्याचा फुगवटा) चालू होणार ‘वॉटर स्पोर्टस’ !   

सातारा जिल्ह्यात पर्यटनवाढीला मोठी संधी असून पर्यटन विकासासाठी आराखडा सिद्ध करून विविध उपक्रम हाती घेण्यात येत आहेत. कोयनेच्या ७० कि.मी.च्या बॅक वॉटरमध्ये (पाण्याच्या फुगवट्यामध्ये) ‘ऑफिशिअल सीक्रेट अ‍ॅक्ट’ (अधिकृत गुपिते कायदा) यामुळे कोणतीही जलक्रीडा करण्यास बंदी होती. कोणतेही नैसर्गिक संतुलन न बिघडता त्यात काही शिथिलता आणता येईल का ? हे पडताळण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी समिती नेमली होती. त्या समितीच्या अहवालानुसार ७ कि.मी. ‘बॅक वॉटर’ (पाण्याचा फुगवटा) आणि २ कि.मी. ‘बफर झोन’ (शहरातील तटस्थ क्षेत्र) वगळता उर्वरित भागात जलक्रीडा चालू करण्यास मान्यता मिळालेली आहे. लवकरच त्याविषयी एम्.टी.डी.सी. आणि जलसंपदा विभाग यांच्यात सामंजस्य करार करण्यात येणार आहे.