Sponge Bomb Israel : गाझामधील हमासच्या बोगद्यांना निकामी करण्यासाठी इस्रायल करणार ‘स्पंज बाँब’चा वापर !

तेल अविव (इस्रायल) – इस्रायलने गाझामध्ये भूमीवरून आक्रमण करण्यास आरंभ केला आहे. हमासने बांधलेल्या बोगद्यांना नष्ट करण्यासाठी इस्रायल ‘स्पंज बाँब’चा वापरही करू शकतो, असे वृत्त आहे. हमासच्या आतंकवाद्यांच्या कारवाया या बोगद्यांमधून चालतात. त्यामुळे सद्यःस्थितीत हे बोगद्यांचे जाळे नष्ट करणे हे मोठे आव्हान आहे, असे तज्ञांचे मत आहे.

आतंकवादी कारवाया घडवून आणण्यासाठी बोगद्यांचा वापर !

हमासने वर्ष २००६ मध्ये गाझा पट्टीत ८० मीटर खोल आणि ३६० वर्ग किमी क्षेत्रामध्ये बोगद्यांंचे जाळे विणले. या बोगद्यांंचा विविध कामांसाठी वापर केला जातो. इजिप्तपर्यंत पसरलेल्या या बोगद्यांंच्या माध्यमातून अमली पदार्थांची तस्करी तर होतेच, यासह या बोगद्यांंमध्ये मदरसे आणि मशिदीही बांधण्यात आल्या आहेत. आतंकवादी कारवाया घडवून आणण्यासाठी तर या बोगद्यांंचा सर्रास वापर केला जातो. या बोगद्यांंची अधिकाधिक उंची साडेसहा फूट, तर रुंदी ३ फूट आहे, असे काही विशेषज्ञांचे मत आहे. काही जण म्हणतात की, बोगद्यांचे जाळे विणून गाझा शहराच्या खाली एक संपूर्ण शहर वसवण्यात आले आहे. येथे आतंकवाद्यांच्या रहाण्याच्या व्यवस्थेपासून खाद्यसामग्री ठेवणे, शस्त्रास्त्रांची गोदामे बांधणे आदी कामे केली जातात. असे असले, तरीही कोणत्याही देशाला या बोगद्यांच्या जाळ्यांची संपूर्ण माहिती कधीच मिळू शकलेली नाही.

इस्रायलचा ‘स्पंज बाँब’ अशा प्रकारे करणार काम !

स्पंज बाँब अशा प्रकारचे उपकरण आहे, जे एका ‘सुरक्षित प्लास्टिक कंटेनर’मध्ये बंद असते. त्याचे २ भाग असून त्यांमध्ये वेगवेगळी रसायने भरलेली असतात. त्या भागांना एका धातूच्या माध्यमातून जोडलेले असते. या बाँबला सक्रीय केल्यानंतर दोन्ही रसायने एकत्र होतात आणि त्या माध्यमातून एका विशेष ‘फोम’ची (‘फेस’ची) निर्मिती होते. हा ‘फेस’ आजूबाजूला गतीने पसरतो आणि त्यानंतर टणक होत जातो. बोगद्यांजवळ हे बाँब सक्रीय करण्यात आल्यास ते बोगद्यांंचे रस्ते पूर्णपणे बंद करून शकतात. याने आतमध्ये हवेचा प्रवाह पूर्णपणे खंडित होऊन आत असलेले आतंकवादी गुदमरून मरतील, असा इस्रायलचा प्रयत्न आहे. याने हे बोगदे निष्प्रभ ठरतील. इस्रायली सैन्याने या बाँबचा प्रयोग वर्ष २०२१ मध्ये केला होता. तेव्हा तो यशस्वी झाला होता.