‘इन्फोसिस’ आस्थापनाचे संस्थापक नारायण मूर्ती यांचा सल्ला !
नवी देहली – भारतीय तरुणांनी आठवड्याला किमान ७० घंटे काम केले पाहिजे, असा सल्ला ‘इन्फोसिस’ या जगप्रसिद्ध भारतीय आस्थापनाचे संस्थापक नारायण मूर्ती यांनी दिला. याचा अर्थ प्रतिदिन १० घंटे काम केले पाहिजे, असे त्यांचे म्हणणे आहे. यासाठी दुसर्या महायुद्धाचा संदर्भत मूर्ती म्हणाले की, दुसर्या महायुद्धाच्या वेळी जर्मन नागरिकांनी अनेक घंटे काम केले. भारतीय तरुणांनीही अशाच पद्धतीने काम करण्याची आवश्यकता आहे. कामात विलंब न करता ते लवकरात लवकर पूर्ण केले पाहिजे.
सौजन्य मनीकंट्रोल
मूर्ती यांनी सांगितल्यानुसार आठवड्यातील ५ दिवस काम करणार्यांनी (‘फाईव्ह डे वीक’ असलेल्यांनी) प्रतिदिन १४ घंटे काम केले पाहिजे, तर ६ दिवस काम करणार्यांनी (‘सिक्स डे वीक’ असलेल्यांनी) प्रतिदिन १२ घंटे काम केले पाहिजे.
मूर्ती यांच्यासारखाच सल्ला अनेक प्रथितयश उद्योगपतींनी वेळोवेळी दिलेला आहे. जगप्रसिद्ध उद्योगपतींनी दिलेले सल्ले पुढीलप्रमाणे :
१. ‘ओला’ आस्थापनाचे मुख्य कार्यकारी अधिकारी भाविश अग्रवाल : कोरोना महामारीनंतर अर्थव्यवस्थेचे पुनरूज्जीवन करण्यासाठी भारतीय युवकांनी प्रत्येक आठवड्याला ६० घंटे तरी काम केले पाहिजे.
२. ‘अलीबाबा’ या चीनच्या आस्थापनाचे संस्थापक जॅक मा : माझ्या आस्थापनाच्या कर्मचार्यांनी दिवसाला १२ घंटे काम केले पाहिजे. सकाळी ९ ते रात्री ९ पर्यंत जे काम करतील, त्यांना अधिक कष्ट घेतल्याचा पुरस्कार मिळेल. एखादा नवा व्यवसाय चालू करायचा असेल, तर प्रतिदिन १२ घंटे काम करण्याची सिद्धता हवी.
३. ‘स्पेस एक्स’ आणि ‘एक्स’ (पूर्वीचे ट्विटर) आस्थापनाचे मालक इलॉन मस्क : वर्ष २०२२ मध्ये ‘ट्विटर’ आस्थापन विकत घेतांना मस्क त्यांच्या कर्मचार्यांना म्हणाले होते, ‘‘कर्मचार्यांनी आठवड्याला १०० घंट्यांहून अधिक वेळ काम करावे.’’
४. ‘बॉम्बे शेविंग कंपनी’ आस्थापनाचे मुख्य कार्यकारी अधिकारी शंतनु देशपांडे : महाविद्यालयातून शिकून बाहेर पडलेल्या तरुणांनी दिवसात १८ घंटे काम केले पाहिजे. तुम्ही मजा करा, चांगले खा-प्या; पण दिवसाचे १८ घंटे काम करा. युवकांनी त्यांच्या व्यवसायिक जीवनाच्या आरंभीची ५ वर्षे तरी १८ घंटे काम केले पाहिजे.
संपादकीय भूमिकाभारताचा उत्कर्ष साधायचा असेल, त्याला बलशाली देश बनवायचा असेल, तर भारतातील केवळ तरुण पिढीच नव्हे, तर सर्व वयोगटांतील नागरिकांनी अपार कष्ट घेणे आवश्यक आहे. त्यामुळे मूर्ती यांनी दिलेला सल्ला हा सर्वांसाठी आणि त्याहून अधिक तरुणांसाठी मोलाचा आहे ! |