ऑनलाईन चालू होती सुनावणी !
कर्णावती (गुजरात) – गुजरात उच्च न्यायालयात एका सुनावणीच्या वेळी एका खंडपिठातील न्यायमूर्ती बीरेन वैष्णव आणि महिला न्यायमूर्ती मौना भट्ट यांच्यात सुनावणीच्या वेळी वाद झाला. न्यायालयाच्या या कक्षात ऑनलाईन सुनावणीसाठी कॅमेरे बसवण्यात आलेले असल्याने हा वाद ऑनलाईन पहाण्यात आला. न्यायालयाच्या यूट्यूब चॅनलवरही याचे प्रक्षेपण केले जात होते. वादामुळे सुनावणी थांबवण्यात आली, तसेच या वादाचा यूट्यूबवरील व्हिडिओ हटवण्यात आला. या वादामुळे दोन्ही न्यायमूर्तींना वेगवेगळ्या खटल्यांच्या सुनावणीसाठी नियुक्त करण्यात आले. त्यामुळे ते २५ ऑक्टोबरला अन्य न्यायमूर्तींसमवेत दिसले.
सध्या या न्यायमूर्तींच्या वादाचा व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित झाला आहे. यात न्यायमूर्ती वैष्णव एक आदेश संमत करतात, तो न्यायमूर्ती भट्ट यांना मान्य नसतो. यावर दोघांत पुढील संभाषण होते,
न्यायमूर्ती वैष्णव : तर तुम्ही वेगळे आहेत. आपण एकमेकांपेक्षा वेगळे आहोत आणि तसे असू शकतो.
न्यायमूर्ती भट्ट : हा वेगळे असण्याचा प्रश्न नाही.
न्यायमूर्ती वैष्णव : मग तुम्ही बडबड करू नका. तुम्ही वेगळा आदेश काढा. आता आपण अधिक सुनावण्या करू शकत नाही.
या नंतर ते दोघेही कक्षातून उठून बाहेर जातात.