माजी आमदार सुभाष झांबडांसह अजिंठा अर्बन बँकेच्या संचालकांचा ९७ कोटी रुपयांचा अपहार !

छत्रपती संभाजीनगर – रिझर्व्ह बँकेच्या निर्बंधांनंतर येथील अजिंठा अर्बन सहकारी बँकेचे अध्यक्ष तथा माजी आमदार सुभाष झांबड, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप कुलकर्णी आणि सनदी लेखापाल (सीए) सतीश मोहरे यांच्या विरोधात सिटी चौक पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या सर्वांनी बनावट दस्त बनवून ९७.४१ कोटी रुपयांचा अपहार केला आहे, असा ठपका यात ठेवण्यात आला आहे. वर्ष २००६ ते २०२३ या १७ वर्षांतील सर्व संचालक, अधिकारी आणि कर्मचारी यांना यात दोषी धरण्यात आले आहे.

वादग्रस्त आर्थिक व्यवहारांच्या संशयावरून २८ ऑगस्ट या दिवशी रिझर्व्ह बँकेने या बँकेवर निर्बंध घातले होते. बँकेला कारभार सुधारण्यासाठी ६ मासांची समयमर्यादा देण्यात आली होती. सुरेश काकडे यांची प्रशासक म्हणून नियुक्ती केली. त्यांच्या पडताळणीत या बँकेचा स्वनिधी आणि ‘सी.आर्.ए.आर्.’मध्ये (भारित मालमत्ता प्रमाण) मोठा फरक दिसला. स्वनिधीत ७०.१४ कोटी रुपये, तर ‘सी.आर्.ए.आर्.’मध्ये ३८.३० कोटी रुपयांचा फरक समोर आला. ३६ खातेधारकांना खोट्या मुदत ठेवी आणि तारण दाखवून ६४.६० कोटी रुपयांचे असुरक्षित कर्ज वाटप केल्याचे आढळून आले होते.