साटेली गावातील पाणीपुरवठा ६ दिवसांनंतर चालू नागरिकांचे पाण्याअभावी झाले हाल !

ठेकेदार आणि ग्रामपंचायत प्रशासन यांच्यातील समन्वयाच्या अभावामुळे समस्या निर्माण झाल्याचा आरोप

दोडामार्ग – नवीन जलवाहिनी टाकतांना जुन्या जलवाहिन्या तुटल्याने साटेली गावात पाणीपुरवठा सुरळीत चालू ठेवण्यात अडचणी येत होत्या. त्यामुळे गेले ६ दिवस साटेली गावात पाणीटंचाईची समस्या निर्माण झाली होती. यामुळे नागरिकांचे प्रचंड हाल झाले; मात्र २१ ऑक्टोबर या दिवशी गावातील पाणीपुरवठा पूर्ववत् करण्यात यश आल्याने नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.

साटेली- भेडशी ग्रामपंचायतीची सार्वत्रिक निवडणूक घोषित झाली आहे. त्यामुळे सध्या ग्रामपंचायतीवर प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली आहे. या गावासाठी नळपाणीपुरवठा योजनेद्वारे पाणीपुरवठा केला जातो. ही नळयोजना जुनी असल्याने आता नवीन जलवाहिनी टाकण्याचे काम चालू आहे. यासाठी जेसीबीच्या साहाय्याने चर खोदतांना भूमीत जवळच असलेल्या जुन्या जलवाहिन्या मोठ्या प्रमाणात उखडल्या गेल्या. त्यामुळे साटेली गावातील अनेक वाड्यांचा पाणीपुरवठा ठप्प झाला होता. त्यामुळे पाण्यासाठी ग्रामस्थांवर दूरवर हेलपाटे मारण्याची वेळ आली. २ दिवसांपूर्वी काही वाड्यांचा पाणीपुरवठा चालू करण्यात आला होता, तर २१ ऑक्टोबर या दिवशी साटेली गावचा पाणीपुरवठा सुरळीत करण्यात यश आले.

‘हे काम करतांना ठेकेदार आणि ग्रामपंचायत प्रशासन यांच्यात समन्वय नसल्याने पाणीटंचाईची समस्या निर्माण झाल्याचा आरोप करत ग्रामस्थांनी पाणीपुरवठा सुरळीत होईपर्यंत लोकांसाठी पाण्याची व्यवस्था करावी’, अशी मागणी नागरिकांनी केली होती.