सिद्धमंत्र – साधना मंत्र कसे म्हणावे ?

सनातननिर्मित दुर्गादेवीचे सात्विक चित्र

‘हिंदु धर्मामध्ये उपासनेला अतिशय महत्त्व आहे. प्राचीन काळापासून ही भगवंत उपासना मोठ्या श्रद्धेने आणि निष्ठेने केली जात आहे. या उपासनेत शक्ती उपासनेला अनन्य साधारण महत्त्व आहे. ही शक्ती उपासना अनेक मार्गांनी सांगितली गेली आहे. त्यात ‘दुर्गासप्तशती ही सर्वश्रेष्ठ मंत्रशक्ती आणि शक्ती उपासना आहे. ‘देवीची उपासना ही भगवतीदेवी या विश्वाची आई-माता-आदिमाता पालन करते आणि प्रत्येक जीवाला आपल्या भव्य रूपात शेवटी समावून घेते’, हे सूत्र लक्षात ठेवून देवीउपासना प्रत्येक देवी भक्ताने श्रद्धापूर्वक अंतःकरणाने करणे अत्यंत आवश्यक आहे.  ‘श्री दुर्गासप्तशती’मध्ये एकूण ७०० श्लोक आहेत.

श्री दुर्गासप्तशतीचे मंत्र, म्हणजे अगदी खरे सांगायचे म्हणजे अमृतमय सार आहेत. ते भक्तीपूर्वक श्रद्धा ठेवून म्हणावे. पहाटे लवकर उठून स्नानानंतर देवपूजा करून नित्य उपासना करून कुलदेवीची पूजा करावी. घरातील देवघरातील टाक मूर्तीची पूजा करावी किंवा दुर्गादेवीची मूर्ती किंवा चित्राची पूजा करावी. त्यानंतर हातात पाणी घेऊन संकल्प करून मंत्र एका वेळी किमान ११ वेळा, २१ वेळा किंवा १०८ वेळा एका वेळी जपावा. भोवती वातावरण शुद्धीसाठी उदबत्ती, शुद्ध तुपाचा दिवा / निरांजन लावावे. घरात गोमूत्र शिंपडावे. भोवतीचे वातावरण भक्तीने आणि श्रद्धेने एकदा का भारले की, देवीला साष्टांग नमस्कार घालून पुन्हा आसन मांडी घालावी. प्रथम खालील ४ मंत्र श्रद्धापूर्वक म्हणावेत.

ॐ ऐं आत्मतत्त्वं शोधयामि  नमः स्वाहा ।
ॐ र्‍हीं विद्यातत्त्वं शोधयामि नमः स्वाहा ।
ॐ क्लीं शिवतत्त्वं शोधयामि नमः स्वाहा ।
ॐ ऐं र्‍हीं क्लीं सर्वतत्त्वं शोधयामि नमः स्वाहा ।।

यानंतर ‘कवच अर्गलाकीलक’ आणि ‘देवी अथर्वशीर्ष’ संकल्पपूर्वक म्हणावे. त्यानंतर देवीची आरती म्हणावी. देवीला साष्टांग नमस्कार घालावा. नैवेद्य दाखवावा. उपस्थित घरातील लोकांना प्रसाद द्यावा. त्यानंतर प्रसाद स्वतः ग्रहण करावा. देवीभक्तांनो, एक लक्षात ठेवा की, आपला आहार अल्प फळे, दूध असा असावा. किमान मासातून एकदा दुर्गाष्टमीस श्री दुर्गासप्तशतीतील मंत्रसाधना अवश्य करता येण्यासारखी आहे. नवरात्रीमध्ये संपूर्ण श्री दुर्गासप्तशती प्राकृत किंवा गद्यरूप कथासाराचे वाचन करावे. देवी तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण करील.

– ज्योतिषी ब.वि. तथा चिंतामणी देशपांडे (गुरुजी), पुणे.

(साभार : मासिक ‘ललना’, दिवाळी २०१२)