पुणे येथील ‘राजीव गांधी प्राणीसंग्रहालया’च्या संचालकांवर गुन्हा नोंद ! 

पुणे – कात्रज येथील ‘राजीव गांधी प्राणीसंग्रहालया’चे संचालक राजकुमार जाधव यांच्याविरुद्ध वन्य प्राण्यांचे चुकीचे व्यवस्थापन केल्यामुळे गुन्हा नोंद करण्यात आला आहे. ही कारवाई वन विभागाकडून केली आहे; मात्र हे प्राणीसंग्रहालय महापालिकेच्या नियंत्रणामध्ये असल्याने महापालिका चौकशी करेल. ही चौकशी येत्या १० दिवसांमध्ये पूर्ण होईल, असे महापालिकेचे आयुक्त विक्रम कुमार यांनी सांगितले आहे. वन विभागाने प्राणी संग्रहालयातील सर्व प्राणी कह्यात घेतले असून त्यांचे स्थलांतरही करण्यात आले आहे.

एप्रिलमध्ये कात्रज येथील या प्राणीसंग्रहालयामध्ये निष्काळजीपणा झाल्याची तक्रार वन्यजीव रक्षक आदित्य परांजपे यांनी वन विभागाकडे केली होती. त्यानंतर वन विभागाने केलेल्या पहाणीमध्ये अनेक प्रकारच्या त्रुटी आणि गंभीर गोष्टी घडल्या असल्याचे आढळून आले.