इस्रायल आणि पॅलेस्‍टाईन युद्ध : साम्राज्‍यवाद नव्‍हे धर्मयुद्धच !

३५ एकर भूमीच्‍या तुकड्यासाठी इस्रायल आणि पॅलेस्‍टाईन यांच्‍यात चालू आहे वर्षानुवर्षे संघर्ष !

७ ऑक्‍टोबरला सकाळी ७ वाजता ‘हमास’ या आतंकवादी संघटनेने अचानक रॉकेटसह इस्रायलवर ५ सहस्र रॉकेट्‌स डागून आक्रमण केले. या आक्रमणात १ सहस्र २०० हून अधिक इस्रायली ठार झाले. प्रत्‍युत्तरात इस्रायलनेही आक्रमण केल्‍याने ९०० हून अधिक पॅलेस्‍टिनींचा मृत्‍यू झाला. इस्रायल आणि पॅलेस्‍टाईन वर्षानुवर्षे का भांडत आहेत ? याचे कारण संपूर्णतः धार्मिक आहे. संपूर्ण जग एकूण ९५ अब्‍ज २९ कोटी ६० लाख एकर भूमीवर स्‍थिरावले आहे. या एकूण भूमीपैकी केवळ ३५ एकरची एक भूमी आहे, ज्‍यासाठी वर्षानुवर्षे युद्ध चालू आहे. आतापर्यंत झालेल्‍या अनेक युद्धात सहस्रो जीव मृत्‍यूमुखी पडले आहेत. हे युद्ध समजून घेण्‍यासाठी या ३५ एकर भूमीचे संपूर्ण सत्‍य समजून घेणे आवश्‍यक आहे.

जेरुसलेममध्‍ये ३५ एकर भूमीवर एक जागा आहे, जी ज्‍यू, मुसलमान आणि ख्रिस्‍ती धर्मांची आहे. ज्‍यू या ठिकाणाला ‘हर-हवाईत’ किंवा ‘टेंपल माऊंट’, तर मुसलमान त्‍याला ‘हरम अल् शरीफ’ म्‍हणतात. ही जागा एकेकाळी पॅलेस्‍टाईनच्‍या कह्यात होती. पुढे इस्रायलने ती आपल्‍या कह्यात घेतली, तेव्‍हापासून या भूमीच्‍या तुकड्यावरून वेळोवेळी संघर्ष चालू झाला.

१. ‘हरम अल् शरीफ’विषयी इस्‍लामी मान्‍यता

‘हरम अल् शरीफ’

मुसलमानांच्‍या विश्‍वासानुसार ‘हरम अल् शरीफ’ हे त्‍यांच्‍यासाठी मक्‍का आणि मदिना यांच्‍या नंतर तिसरे पवित्र स्‍थान आहे. इस्‍लामी धार्मिक ग्रंथ कुराणानुसार शेवटचे प्रेषित महंमद उडत्‍या घोड्यावर स्‍वार होऊन मक्‍केहून हरम अल शरीफ येथे पोचले. येथून ते स्‍वर्गात गेले. जेरुसलेममध्‍ये याच हरम अल शरीफवर मशीद बांधण्‍यात आली होती. ज्‍याचे नाव ‘अल अक्‍सा मशीद’ आहे. ‘जेरुसलेममध्‍ये आल्‍यानंतर प्रेषित महंमद यांनी ज्‍या ठिकाणी पाय ठेवले होते, त्‍याच ठिकाणी ही मशीद बांधण्‍यात आली आहे’, असे मानले जाते. अल अक्‍सा मशिदीजवळ सोन्‍याच्‍या घुमटाची इमारत आहे. त्‍याला ‘डोम ऑफ द रॉक’ म्‍हणतात. इस्‍लामी मान्‍यतेनुसार हे तेच ठिकाण आहे, जेथून प्रेषित महंमद स्‍वर्गात गेले होते. या कारणास्‍तव मुसलमानांसाठी ही अतिशय पवित्र ठिकाणे आहेत. त्‍यामुळे या जागेवर ते दावा करत आहेत.

२. ज्‍यूंच्‍या दृष्‍टीने ‘टेंपल माऊंट’ची मान्‍यता

ज्‍यूंचा असा विश्‍वास आहे की, त्‍यांचे जेरुसलेममध्‍ये ‘टेंपल माऊंट’ त्‍याच भूमीवर आहे. त्‍या ठिकाणी त्‍यांच्‍या देवाने माती ठेवली होती. ज्‍यातून आदमचा जन्‍म झाला. ज्‍यूंचा असा विश्‍वास आहे की, ही तीच जागा आहे, जेथे देवाने अब्राहमला बलीदान करण्‍यास सांगितले होते. अब्राहमला एक इस्‍माईल आणि दुसरा इसहाक, अशी २ मुले होती. अब्राहमने देवाच्‍या बाजूने इसहाकला बलीदान देण्‍याचा निर्णय घेतला. ज्‍यूंच्‍या समजूतीनुसार देवदूताने इसहाकच्‍या जागी एक मेंढी ठेवली होती. ज्‍या ठिकाणी ही घटना घडली, त्‍या ठिकाणाचे नाव ‘टेंपल माऊंट’ आहे. याचा उल्लेख ज्‍यूंचा धार्मिक ग्रंथ ‘हिबू बायबल’मध्‍ये आहे. नंतर इसहाकला जेकब नावाचा मुलगा झाला. त्‍याचे दुसरे नाव इस्रायल होते. इस्रायलला नंतर १२ मुले झाली. त्‍यांच्‍या नावाने इस्रायलच्‍या १२ जमाती होत्‍या. ज्‍यूंच्‍या मान्‍यतेनुसार या जमातींच्‍या पिढ्यांनी नंतर ज्‍यू राष्‍ट्राची निर्मिती केली.

जेरुसलेममधील ‘वेस्‍टर्न वॉल’

३. ‘ज्‍यू वेस्‍टर्न वॉल’ ही ‘होली ऑफ होलीज’चा एक भाग

‘वेस्‍टर्न वॉल’ ही ‘होली ऑफ होलीज’चा एक भाग आहे. इस्रायलच्‍या भूमीवर ज्‍यूंनी बांधलेले मंदिर ज्‍याचे नाव ‘पहिले मंदिर’ होते. हे इस्रायलचा राजा सोलोमन याने बांधले होते. पुढे हे मंदिर शत्रू देशांनी उद़्‍ध्‍वस्‍त केले. काही वर्षांनंतर ज्‍यूंनी त्‍याच ठिकाणी पुन्‍हा मंदिर बांधले. त्‍याचे नाव ‘दुसरे मंदिर’ होते. या दुसर्‍या मंदिराच्‍या आतील भागाला ‘होली ऑफ होलीज’ असे म्‍हणतात. ज्‍यूंच्‍या मते हे असे पवित्र स्‍थान होते, जेथे विशेष याचकांविना स्‍वतः ज्‍यू लोकांनाही जाण्‍याची अनुमती नव्‍हती. हेच कारण आहे की, खुद्द ज्‍यूंनाही दुसर्‍या मंदिराची पवित्र जागा दिसली नाही; पण वर्ष १९७० मध्‍ये रोमनने हेही मोडून काढले. या मंदिराची एक भिंत तशीच राहिली. ही भिंत अजूनही शाबूत आहे. या भिंतीला ‘ज्‍यू वेस्‍टर्न वॉल’ म्‍हणतात. ज्‍यू लोक या ‘वेस्‍टर्न वॉल’ला ‘होली ऑफ होलीज’चा एक भाग मानतात.

४. ख्रिस्‍त्‍यांच्‍या दृष्‍टीने ३५ एकर जागेचे महत्त्व

ख्रिस्‍त्‍यांचा असा विश्‍वास आहे की, येशू ख्रिस्‍ताने या ३५ एकरच्‍या भूमीत प्रचार केला. येथेच त्‍याला वधस्‍तंभावर खिळे ठोकण्‍यात आले. ‘तो पुन्‍हा उठेल. आता जेव्‍हा तो पुन्‍हा जिवंत होईल, तेव्‍हा ही जागा महत्त्वाची भूमिका बजावेल’, अशी ख्रिस्‍त्‍यांची श्रद्धा आहे. साहजिकच अशा स्‍थितीत हे ठिकाण मुसलमान किंवा ज्‍यू यांच्‍या एवढेच ख्रिस्‍त्‍यांसाठीही पवित्र आहे.

५. पॅलेस्‍टाईन आणि इस्रायल यांचा इतिहास

वर्ष ११८७ पूर्वी काही काळ ‘हरम अल् शरीफ’ किंवा ‘टेंपल माऊंट’ ख्रिस्‍त्‍यांच्‍या कह्यात होते. वर्ष ११८७ मध्‍ये ‘हरम अल् शरीफ’ मुसलमानांनी कह्यात घेतले. यानंतर त्‍याच्‍या संपूर्ण व्‍यवस्‍थापनाचे दायित्‍व वक्‍फ म्‍हणजेच इस्‍लामिक ट्रस्‍टला देण्‍यात आले. या काळात या ठिकाणी मुसलमानेतरांना प्रवेश नव्‍हता. वर्ष १९४८ पूर्वी ‘हरम अल् शरीफ’ पॅलेस्‍टाईनचा भाग होता. तरीही काही ज्‍यू येथे निर्वासित म्‍हणून रहात होते; पण त्‍या वेळी पॅलेस्‍टाईन इंग्रजांच्‍या कह्यात होता. वर्ष १९४८ मध्‍ये ब्रिटिशांनी पॅलेस्‍टाईनचे दोन तुकडे केले, जसे इंग्रजांनी वर्ष १९४७ मध्‍ये भारताचे २ तुकडे केले होते. त्‍यानंतर संपूर्ण पॅलेस्‍टिनी भूमीपैकी ५५ टक्‍के भूमी पॅलेस्‍टाईन, तर ४५ टक्‍के इस्रायलच्‍या वाट्याला आली. यानंतर १४ मे १९४८ या दिवशी इस्रायलने स्‍वतःला ‘एक स्‍वतंत्र देश’ घोषित केले आणि जगात प्रथमच ज्‍यू देशाचा जन्‍म झाला; पण जेरुसलेमचा लढा अजूनही चालूच आहे.

(साभार : ‘आज तक’ वृत्तवाहिनी)

इस्रायल ‘संशयाची सुई’ म्‍हणून पहात असलेला आतंकवादी महंमद देईफ कोण आहे ?

‘हमास’ या आतंकवादी संघटनेने इस्रायलवर केलेले आक्रमण घडवून आणण्‍यामागे महंमद देईफ हा सूत्रधार असल्‍याचा इस्रायलचा विश्‍वास आहे. (अरबी भाषेत देईफ म्‍हणजे ‘पाहुणे’ असा अर्थ आहे) इस्रायलने महंमद देईफला नवा ‘ओसामा बिन लादेन’ म्‍हटले आहे.

१. महंमद देईफची पार्श्‍वभूमी

महंमद देईफ याचा जन्‍म गाझा येथे ऑगस्‍ट १९६५ मध्‍ये झाला. त्‍याच्‍या वडिलांचे नाव महंमद दीब इब्राहिम अल मसरी होते. महंमद देईफचा जन्‍म एका निर्वासित छावणीत झाला. त्‍याने स्‍वतःचे नाव पालटून अरबी भाषेत ‘देईफ’ असे ठेवले. महंमद देईफ हा हमास या आतंकवादी संघटनेची लष्‍करी शाखा ‘अल् कासम’ ब्रिगेडचा कमांडर आहे. इस्रायलकडे त्‍याचे एकच छायाचित्र आहे.

२. महंमद देईफ रहातो कुठे ?

असे म्‍हटले जाते की, इस्रायलची गुप्‍तचर संस्‍था ‘मोसाद’ने ५८ वर्षीय महंमद देईफला ७ वेळा मारण्‍याचा प्रयत्न केला; परंतु प्रत्‍येक वेळी तो अयशस्‍वी झाला. ‘मोसाद’ अनेक दशकांपासून महंमद देईफचा शोध घेत आहे; पण प्रत्‍येक वेळी तो तिच्‍या जाळ्‍यातून निसटतो. विविध संकेतस्‍थळांवरील बातम्‍यांनुसार महंमद देईफ हा नेहमी चाकांच्‍या खुर्चीवर (‘व्‍हीलचेअर’वर) असतो आणि गाझामध्‍ये बांधलेल्‍या भूमीगत बोगद्यांच्‍या नेटवर्कमध्‍ये तो रहातो. यामुळे महंमद देईफ प्रत्‍येक वेळी ‘मोसाद’च्‍या हातातून निसटतो. हे बोगदे बांधण्‍यात महंमद देईफ याचाही हात आहे. तो प्रतिदिन रात्री स्‍वतःचे स्‍थान पालटत रहातो आणि कधीही एका जागी थांबत नाही. तो इस्रायली लोकांच्‍या हत्‍येचे आवाहन करणारे ध्‍वनीमुद्रित (रेकॉर्ड) केलेले संदेश हमासच्‍या आतंकवाद्यांना अनेकदा पाठवतो. देईफ याने अन्‍य देशांतील आपल्‍या समर्थकांना हमासमध्‍ये सहभागी होण्‍याचे आवाहन केले आहे. परिणामी अनेक देशांतील नागरिक या आतंकवादी कारवायांत अडकण्‍याचा धोका आहे.

(माहिती स्रोत : विविध संकेतस्‍थळे)