केंद्रीय मंत्री आणि मुख्यमंत्री यांच्याची चर्चा करून निर्णय घेतल्याची नगर नियोजन मंत्री विश्वजीत राणे यांची माहिती
पणजी, ९ ऑक्टोबर (वार्ता.) : पेडणे विभागीय आराखडा (झोनिंग प्लान) अनिश्चित कालावधीसाठी स्थगित करण्यात आल्याची घोषणा नगर नियोजन मंत्री विश्वजीत राणे यांनी आल्तिनो येथील वनभवन इमारतीमध्ये घेतलेल्या एका पत्रकार परिषदेत केली. या वेळी पेडणेचे माजी आमदार दयानंद सोपटे यांच्यासह तालुक्यातील विविध पंचायतींचे सरपंच आणि पंचसदस्य उपस्थित होते. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा आणि मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याची चर्चा करून हा निर्णय घेतल्याची माहिती मंत्री विश्वजीत राणे यांनी दिली. ‘यानंतर स्थानिक आणि केंद्रीय नेते यांच्याशी चर्चा करूनच पुढील निर्णय घेण्यात येणार आहे’, असे मंत्री राणे यांनी पुढे सांगितले.
पेडणे ‘झोनिंग प्लान’ला पेडणे तालुक्यातून मोठ्या प्रमाणावर विरोध झाला आहे, तसेच ९ ऑक्टोबरपर्यंत आराखडा रहित न केल्यास जनआंदोलन छेडण्याची चेतावणी पेडणेवासियांनी दिली होती. या पार्श्वभूमीवर सरकारने हा निर्णय घेतला आहे.
या वेळी मंत्री विश्वजीत राणे म्हणाले, ‘‘पेडणेच्या ‘झोनिंग प्लान’संबंधी पेडणे तालुक्यातील अनेकांनी नगर नियोजन खात्याकडे अत्यंत वस्तूनिष्ठ आणि गंभीर अशा समस्या मांडल्या आहेत. त्यामुळे लोकांच्या हितासाठीच हा निर्णय घेतला आहे.’’ राजकीय संघर्षामुळे पेडणे ‘झोनिंग प्लान’ रहित केला का ? असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता मंत्री विश्वजीत राणे यांनी ‘मी मागील नगर नियोजन मंत्र्यांसारखा नाही. माझे चरित्रच वेगळे आहे. त्यामुळे आराखडा रहित करण्याच्या निर्णयाला राजकीय कारण जोडू नये.’, असे उत्तर दिले.
(सौजन्य : prime media goa)
आराखडा पूर्णत: रहित करा ! – जीत आरोलकर, आमदार
पेडणेचा ‘झोनिंग प्लान’ पूर्णत: रहित करण्याची मागणी आहे. आराखडा तूर्त स्थगित ठेवण्याच्या निर्णयावर जनता आणि मी समाधानी नाही, अशी प्रतिक्रिया मांद्रेचे आमदार जीत आरोलकर यांनी व्यक्त केली आहे.