पाथर्डी (जिल्हा अहिल्यानगर) – शारदीय नवरात्रोत्सव कालावधीमध्ये ‘मोहटादेवी देवस्थान ट्रस्ट’ने मंदिर गाभार्याच्या आतमधून देवीचे ‘व्हीआयपी’ (महनीय व्यक्तींसाठी) दर्शन बंद करण्याच्या घेतलेल्या निर्णयास प्रशासनाचे सहकार्य लाभले. कुणीही मंदिर गाभार्यातील दर्शनासाठी आग्रह धरू नये, नवरात्रोत्सवाच्या कालावधीत अनुमाने १० लाख भाविक येथे येतात, त्या येणार्या सर्व भाविकांना सर्व प्रकारच्या चांगल्या सुविधा देण्यासाठी संबंधित सर्व शासकीय विभाग प्रमुखांना सूचना दिल्याची माहिती जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी दिली. ते श्री मोहटादेवी नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर श्री मोहटादेवी गडावर घेतलेल्या आढावा बैठकीमध्ये बोलत होते. या वेळी ‘श्री मोहटादेवी देवस्थान ट्रस्ट’चे पदाधिकारी आणि शासकीय विभाग प्रमुख उपस्थित होते.
जिल्हाधिकारी सालीमठ म्हणाले की, श्री मोहटादेवी गड रस्ता, पाथर्डी शहरातील वाहतुकीला, तसेच भाविकांना अडथळा ठरणारी रस्त्यावरची सर्व अतिक्रमणे काढून टाका. उत्सव काळात खाद्यपदार्थांच्या दुकानांची अन्न आणि प्रशासनाच्या विभागाने प्रभावित पहाणी करावी, तसेच अवैध मद्य बंदीसाठी प्रभावी कारवाई करून या काळात अवैधरित्या मद्य विक्री होणार नाही याकडे लक्ष द्यावे. दुष्काळ परिस्थिती निर्माण झाल्याने भाविकांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था शासकीय पाणी टँकरद्वारे करण्यात येईल.