नाशिक येथील श्री कालिकामातेचे नवरात्रोत्सवात २४ घंटे दर्शन !

  • १०० रुपयांचा देणगी पास !

  • कडेकोट सुरक्षाव्यवस्था

  • ५१ सीसीटीव्हींद्वारे लक्ष ठेवणार !

श्री कालिकामाता मंदिर, नाशिक

नाशिक – येथील ग्रामदैवत म्हणून ओळख असलेल्या श्री कालिकामातेचे मंदिर नवरात्रोत्सवाच्या काळात २४ घंटे खुले ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मंदिरात भाविकांच्या गर्दीचा दिवसेंदिवस वाढणारा ओघ लक्षात घेता यंदा कोजागरी पौर्णिमेपर्यंत हा उत्सव चालू ठेवण्याचे नियोजन संस्थान व्यवस्थापनाने केले आहे. त्र्यंबकेश्वर देवस्थानच्या धर्तीवर यंदाच्या नवरात्रोत्सवात ‘१०० रुपये घेऊन पास देणे (‘पेड पास’ची) सुविधा उपलब्ध करून देण्यात येईल’, असा निर्णय मंदिर संस्थानच्या बैठकीत घेण्यात आला आहे. (पैसे घेऊन दर्शन दिल्यामुळे भ्रष्टाचारास वाव मिळून इतर भक्तांना अनेक घंटे रांगेत उभे रहावे लागते. त्यामुळे ही सुविधा बंद करावी. – संपादक)

नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ३ ऑक्टोबर या दिवशी श्री कालिकामाता सभागृहात महापालिका आणि पोलीस प्रशासन यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत वरील निर्णय घेण्यात आले.

सप्तशृंगीदेवी मंदिरही २४ घंटे खुले !

सप्तशृंगीदेवी विश्वस्त संस्थानकडूनही सांगण्यात आले, ‘‘येत्या नवरात्रोत्सवाच्या काळात भाविकांना सप्तशृंगीदेवीचे दर्शन २४ घंटे खुले असणार आहे.’’

बैठकीतील अन्य निर्णय !

१. गाभार्‍यातील श्री महालक्ष्मी, श्री सरस्वती आणि श्री महाकाली यांच्या सुंदर मूर्ती भाविकांचे आकर्षण ठरतात. त्यामुळे यात्रा कालावधी वाढवण्याचा विचार आहे.

२. ‘यात्रोत्सव काळात महापालिकेच्या वतीने प्लास्टिकवर बंदी घालण्यात आली आहे. याची काटेकोर कार्यवाही करण्यात यावी’, असा आदेश बैठकीत देण्यात आला.

३. नवरात्रोत्सवासाठी ५१ सीसीटीव्ही लावण्यात आले आहेत. सुरक्षिततेच्या दृष्टीने ४० पुरुष आणि महिला सुरक्षारक्षकांची नेमणूक करण्यात येणार आहे. महापालिकेकडूनही ४० सुरक्षारक्षक नेमण्यात आले आहेत.

४. मंदिर परिसरात रुग्णवाहिकेची सोय, १०० हून अधिक स्वयंसेवक, भाविकांसाठी २ कोटी रुपये विमा कवच, तर १ कोटी रुपये देव दागिन्यांसाठी विमा कवच आहे.

५. मंदिर परिसरात गर्दी होणार असल्याने पोलिसांचा चोख बंदोबस्त असणार आहे.

संपादकीय भूमिका

मंदिरात पैसे घेऊन दर्शनाची व्यवस्था करण्यात येणे, याला मंदिरांचे सरकारीकरणच कारणीभूत आहे. ते थांबवण्यासाठी मंदिरे सरकारच्या कह्यातून मुक्त करून भाविकांकडेच सोपवली पाहिजेत !