‘श्राद्ध’ विधीचा पाया हा ‘आत्‍मा अमर आहे’ आणि तो ‘मोक्षाकडे वाटचाल करणारा’, या सूत्रावर आधारित !

सर्व वेदवेत्‍या गुरुजनांना वंदन करून श्राद्ध किंवा महालय या विषयात उद़्‍भवणारे प्रश्‍न आणि निर्माण केले जाणारे संभ्रम यांविषयी आज मत मांडत आहे. ३ ऑक्‍टोबर या दिवशी प्रसिद्ध झालेल्‍या लेखात आपण ‘श्राद्धकाल, श्राद्धासाठीची पवित्र स्‍थाने, श्राद्ध आणि भोजन कर्ता यांच्‍यासाठीचे नियम’, यांविषयीची माहिती वाचली.

सर्वप्रथम लेख वाचतांना आणि चिंतन करतांना प्रत्‍येक गोष्‍ट ही ‘वैज्ञानिक सिद्ध’ किंवा ‘पाश्‍चात्त्य सिद्ध’ हवी, हा आग्रह धरू नये. सर्वच गोष्‍टी मानवी डोळ्‍यांना (चर्मचक्षूंना) दिसत नाहीत, त्‍यांचा अनुभव घ्‍यावा लागतो आणि ज्‍या ऋषिमुनी अन् संतमहात्‍मे यांना अनुभवता आल्‍या, त्‍यांच्‍या अनुभवसिद्ध मार्गाने जाणे, हे श्रेयस्‍कर ठरते. आपल्‍या दैनंदिन जीवनातही आपण जुन्‍या जाणत्‍यांना आलेल्‍या बोधावरून किंवा त्‍यांच्‍या मार्गदर्शनाने जात असतो आणि आपल्‍या चुका टाळत असतो. ‘चक्षुर्वै सत्‍यम् ।’, म्‍हणजे ‘जे प्रत्‍यक्ष डोळ्‍यांनी दिसते, तेच सत्‍य आहे, असे समजणे.’ हाच विज्ञानवाद असेल, तर मग ‘मन’ हे कोणत्‍या एक्‍स-रे, सिटी स्‍कॅन, एम्.आर्.आय. किंवा अन्‍य चाचण्‍यांमधून आपल्‍याला दिसते का ? आणि जर ते प्रत्‍यक्ष डोळ्‍यांना दिसत नसेल, तर मग मन आहे, हे कसे सिद्ध होईल ? अन् जोपर्यंत हे सिद्ध होत नाही, तोपर्यंत मग मानसोपचार तज्ञ ही वैज्ञानिक शाखा आणि त्‍याद्वारे होणारे उपचार  म्‍हणजे रोग्‍याच्‍या जीवनाशी खेळ होत नाही का ?

ही प्रस्‍तावना करण्‍यामागे हेतू हाच आहे की, विज्ञानही ‘गृहितकां’वर चालते. ‘श्राद्ध’ या विधीचा पाया हा ‘आत्‍मा अमर आहे आणि त्‍याला विविध योनींमध्‍ये जन्‍म घेऊन आत्‍मोन्‍नती करून मोक्षाकडे जाणे’, या मुख्‍य सूत्रावर आधारित आहे. 

(भाग ३)

या लेखाचा मागील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/724632.html

१. आत्‍म्‍याला कुणीही कापू अथवा जाळू न शकण्‍याविषयी श्रीकृष्‍णाने केलेले अलौकिक वर्णन

भगवद़्‍गीतेत स्‍पष्‍टपणे म्‍हटले आहे, ‘वासांसि जीर्णानि यथा विहाय ।’ (श्रीमद़्‍भगवद़्‍गीता, अध्‍याय २, श्‍लोक २२), म्‍हणजे ‘ज्‍याप्रमाणे माणूस जुनी वस्‍त्रे टाकून देऊन नवी वस्‍त्रे घेतो’  त्‍याचप्रमाणे ‘आत्‍मा हे जीर्ण शरीर टाकून नवीन शरीर धारण करतो’, हा नियम सर्वसामान्‍यांकरता जाणावा. संत, तपस्‍वी योगी हे स्‍वत: ठरवून जन्‍म घेतात आणि स्‍वेच्‍छेनेच देहत्‍याग करतात.

‘नैनं छिन्‍दन्‍ति शस्‍त्राणि ।’ (श्रीमद़्‍भगवद़्‍गीता, अध्‍याय २, श्‍लोक २३), म्‍हणजे ‘या आत्‍म्‍याला शस्‍त्रे कापू शकत नाहीत’, तसेच ‘आत्‍म्‍याला कोणताही अग्‍नी जाळू शकत नाही, वारा उडवू शकत नाही आणि पाणी हे आत्‍म्‍याला भिजवू शकत नाही’, असे म्‍हटले आहे.

वेदमूर्ती श्री. भूषण  जोशी

एखादा म्‍हणेल हे सिद्ध करा, तर याकरता एक दृष्‍टांत रूपक कथा आहे, ती येथे देत आहे. गोपालकृष्‍णांचे बालवयातील पराक्रम आणि कीर्ती ऐकून एक वेदशास्‍त्र संपन्‍न ब्राह्मण काशीतून भगवंताच्‍या भेटीला आला आणि (आत्‍मा अमर असतो, हे उपनिषद प्रतिपाद्य वचन नीट समजून घेऊ, ही त्‍याची कामना होती.) गोकुळात आल्‍यावर नंद महाराजांनी त्‍यांचे स्‍वागत केले. येथे त्‍यांचा संवाद देत आहे.

श्रीकृष्‍ण : हे भूदेवा, आपण कुठून आला ?

ब्राह्मण : काशी नगरातून.

श्रीकृष्‍ण : काशीत कुठून आला ?

ब्राह्मण : मातेच्‍या गर्भातून, जन्‍म काशीतच झाला.

श्रीकृष्‍ण : मातेकडे कुठून आला ?

ब्राह्मण : पित्‍याकडून.

श्रीकृष्‍ण : पित्‍याकडे कुठून आला ?

ब्राह्मण : त्‍यांच्‍या अन्‍नातून (वीर्य किंवा तेज हे अन्‍नापासून बनते), म्‍हणजे भाकरीतून समजा.

श्रीकृष्‍ण : मग जेव्‍हा तुम्‍ही ज्‍वारीचे बीज होता आणि गरम भूमीत तुम्‍हाला पेरले, तेव्‍हा चटका बसला होता का ?

ब्राह्मण : नाही.

श्रीकृष्‍ण : पाऊस पडल्‍यावर तुम्‍ही भिजला होता का ?

ब्राह्मण : नाही.

श्रीकृष्‍ण : मग पीक चांगले पिकले, तेव्‍हा तुम्‍हाला विळ्‍याने कापले, तेव्‍हा रक्‍त आले होते का ?

ब्राह्मण : नाही.

श्रीकृष्‍ण : मग बैलांच्‍या पायाखाली ‘मळणी’ करतांना, दाणे काढतांना काही लागले होते का ? किंवा पिकाला हवा लागली, त्‍या वेळी तुम्‍ही उडून गेला होता का ?

ब्राह्मण : नाही.

श्रीकृष्‍ण : जात्‍यात दळले, तेव्‍हा काही दुखापत झाली का ? किंवा गरम पाणी घालून पीठ भिजवले, तेव्‍हा तुम्‍ही ओले झाला का ?

ब्राह्मण : अजिबात नाही.

श्रीकृष्‍ण : गरम तव्‍यावर भाकरी भाजतांना तुम्‍हाला चटके बसले होते का ?

ब्राह्मण : नाही

मग श्रीकृष्‍णाने विचारले, ‘‘याचे कारण काय ?’’ ब्राह्मण म्‍हणाला, ‘‘देवा तुम्‍हीच सांगा.’’ तेव्‍हा भगवंत म्‍हणतात,

‘‘नैनं छिन्‍दन्‍ति शस्‍त्राणि नैनं दहति पावकः ।
न चैनं क्‍लेदयन्‍त्‍यापो न शोषयति मारुतः ॥

– श्रीमद़्‍भगवद़्‍गीता, अध्‍याय २, श्‍लोक २३

अर्थ : या आत्‍म्‍याला शस्‍त्रे कापू शकत नाहीत, विस्‍तव जाळू शकत नाही, पाणी भिजवू शकत नाही आणि वारा वाळवू शकत नाही.

अच्‍छेद्योऽयमदाह्योऽयमक्‍लेद्योऽशोष्‍य एव च ।
नित्‍यः सर्वगतः स्‍थाणुरचलोऽयं सनातनः ॥

– श्रीमद़्‍भगवद़्‍गीता, अध्‍याय २, श्‍लोक २४

अर्थ : कारण हा आत्‍मा कापता न येणारा, जाळता न येणारा, भिजवता न येणारा आणि निःसंशय वाळवता न येणारा आहे. तसेच हा आत्‍मा नित्‍य, सर्वव्‍यापी, अचल, स्‍थिर रहाणारा आणि सनातन आहे.’’

या श्‍लोकातील ‘सर्वगत:’ हा शब्‍द फार महत्त्वाचा आहे. भगवंताच्‍या सर्व सृष्‍टीत जीवात्‍मे आहेत, हे नि:संशय आहे. ते पाण्‍यात, हवेत, भूमीवर, वृक्षवेली आणि अग्‍नीतही आहेत. अशी एकही जागाच नाही, जिथे जीवात्‍मे नाहीत.

२. आत्‍मा ही एक ऊर्जा असून ती नष्‍ट करता येणे अशक्‍य !

सुईच्‍या अग्रावर रहाणारे आणि दुर्बिणीद्वारे दिसणारे अन् न दिसणारे लाखो जंतू हे सजीवच आहेत आणि हत्तीप्रमाणे उंच, धिप्‍पाड दिसणारे हेही सजीवच आहेत. आत्‍मा ही एक ऊर्जा आहे आणि ती निर्माण करता येत नाही किंवा नष्‍ट करता येत नाही. ती एका ऊर्जेतून दुसर्‍या ऊर्जेत परावर्तित करता येते. (पुनर्जन्‍म ही संकल्‍पना अशा प्रकारची आहे.) अनेकदा वृत्तपत्रांमधूनही ‘पुनर्जन्‍मातील स्‍मृतीमुळे हत्‍या करणारे सापडले’, आदी घटना वाचल्‍या किंवा ऐकल्‍या आहेत. (सर्वांनाच गतजन्‍माची स्‍मृती नसते.)

३. पितरांच्‍या गतीकरता श्राद्ध करणे आवश्‍यक !

देह जरी नष्‍ट झाला, तरी वासना नष्‍ट होत नाही. आपुलकी, स्नेहभाव नष्‍ट होत नाहीत. शास्‍त्रकारांनी ‘आई-वडील जिवंत असतांना त्‍यांची सेवा करा, त्‍यांचा आदर करा’, हे सांगितले आहेच, याच समवेत त्‍यांच्‍या पश्‍चात त्‍यांच्‍या गतीकरता श्राद्धही सांगितले आहे. तेव्‍हा ऋषींचे वचन आणि भगवद़्‍गीतेवर विश्‍वास ठेवून पितरांचे स्‍मरण करूया अन् त्‍यांचे आशीर्वाद प्राप्‍त करूया.

(समाप्‍त)

– वेदमूर्ती भूषण दिगंबर जोशी, वेंगुर्ला, सिंधुदुर्ग. (२८.९.२०२३)