४.१०.२०२३ (भाद्रपद कृष्ण षष्ठी) या दिवशी ‘ज्ञानेश्वरी जयंती’ आहे. त्या निमित्ताने…
आपल्या सनातन संस्कृतीचे हे आगळे वैशिष्ट्य आहे की, आम्ही श्रीकृष्णजन्म तर साजरा करतोच; परंतु ‘गीताजयंती’ही साजरी करतो. मोठा संहार घडलेल्या महाभारत युद्धाच्या पार्श्वभूमीवर झालेल्या संवादांची जयंती साजरी करणे, यातून आपली सनातन संस्कृती जोपासत असलेली मूल्ये लक्षात येतात. एखाद्या ग्रंथाची जयंती साजरी करण्याने त्या ग्रंथातील तत्त्वबोध आणि विचार यांना त्या संस्कृतीमध्ये कोणते स्थान आहे, ते स्पष्ट होते. ‘ज्ञानेश्वरी जयंती’ भाद्रपद कृष्ण षष्ठीला साजरी करण्यात येते. त्या निमित्ताने हा लेखनप्रपंच…
१. ज्ञानेश्वरी ग्रंथाच्या वाचनाने झालेले लाभ
गेले कित्येक मास मी जवळपास प्रतिदिन सकाळी साधारण १५ ते २० मिनिटे ज्ञानेश्वरी ग्रंथाचे वाचन करत आहे. माझे वाचन अगदी वरवरचे आहेे. असे असूनही हे वाचन करत असतांना आणि केल्याने मला पुढीलप्रमाणे लाभ झाला.
१ अ. ईशानुसंधान सहज साधणे : ज्ञानेश्वरीचे वाचन करतांना माझ्या मनातील अन्य विचार जाऊन माझ्या मनाची पाटी स्वच्छ होत असे. वाचन करतांना मनात आपोआप चालू झालेले ईशानुसंधान (ईश्वराशी अनुसंधान), म्हणजे ‘वाचनानंतर नामजप होणे, मन शांत होणे, पुष्कळ काळ तृप्त वाटणे, आनंद होणे, साधनासापेक्ष आश्वस्त वाटणे, ‘देव सभोवताली आहे’, असे वाटणे, पूर्वी मन शांत असतांनाही शरिरात जाणवणारी अस्वस्थता न्यून होणे’, अशी मनाची अवस्था या ना त्या प्रकारे काही काळ सलग आणि नंतर अधून-मधून दिवसभर होत रहात असे.
१ आ. ईशचिंतन सहज होणे : वाचन झाल्यानंतर मधून-मधून माझे ईशचिंतन (देवाचे चिंतन) होत राहून मला पुढील लाभ झाले.
१. माझ्या मनातील स्वभावदोष आणि अहं यांच्या संदर्भातील विचारांच्या छोट्या लहरींविषयी माझी संवेदनशीलता वाढली.
२. मन स्वीकारो अथवा न स्वीकारोे, तरी ‘अद्वैत हे वास्तव आहे’, याची बुद्धीला अधूनमधून जाणीव होत रहाते.
३. भूतकाळातील घटनांमुळे होणार्या मनोवेदना न्यून झाल्या.
४. गुरु आणि गुरुपरंपरा यांविषयी भाव अन् अभिमान वाढला.
५. ‘ईशप्राप्ती’ म्हणजे काय ?’, याचे आकलन थोडे वाढलेे.
६. प्रत्येक दिवशी सकाळी मी वाचलेल्या आणि भावलेल्या सूत्रांचे स्मरण होताच बर्याचदा पुन्हा अल्पकाळ ती अवस्था मला प्राप्त होऊ लागली.
एकूण माझे वैचारिक जीवन हळूहळू पालटत गेले.
२. ग्रंथ आणि ग्रंथकार संबंध
‘श्रीकृष्ण समजायचा असेल, तर गीता समजायला हवी’, असे ज्ञानी सांगतात, तसेच संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांना समजून घ्यायचे असेल, तर ज्ञानेश्वरी समजायला हवी. प.पू. भक्तराज महाराज सांगायचे, ‘भजन माझे चरित्र आहे.’ ज्ञानेश्वरीचे वाचन करत असतांना मला या विभूतींच्या म्हणण्याच्या भावार्थाची दिशा समजली आणि माझे मन कृतार्थ झाले. त्यामुळे जर मी संत ज्ञानेश्वरांची स्तुती ‘एक अल्पमती भक्त’ म्हणून कृतज्ञतापूर्वक न करता राहिलो, तर मी सदा अस्वस्थ राहीन. यासाठी मोजकी सूत्रे येथे मांडत आहे.
३. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांचा गीतेविषयीचा भाव आणि प्रांजळपणा
अ. गीतेच्या चौथ्या अध्यायातील पहिला श्लोक निरुपणासाठी घेण्याआधी संत ज्ञानेश्वर महाराज ‘स्वत:ला काय लाभ झाला ?’ हे कसे सांगत आहेत, ते पहा.
आजिं श्रवणेंद्रियां पाहलें । जे येणे गीतानिधान देखिलें ।
आता स्वप्नचि हे तुकलें । साचासरिसें ॥
– ज्ञानेश्वरी, अध्याय ४, ओवी १
अर्थ : आता या श्रवणेंद्रियांनी आज गीतेसारखा अमोल ठेवा पाहिला; म्हणून परमसुखाची सकाळ झाली आणि स्वप्नासारखे वाटणारे हे जगत सत्य वाटू लागले.
यातील तीनही सूत्रे मनोज्ञ आहेत. त्यातही शेवटचे सूत्र संत ज्ञानेश्वर महाराज दुसर्या अध्यायातील (सांख्ययोगातील ‘मारणारा कोण, मरणारा कोण, ब्रह्म केवळ एकमात्र सत्य’ अशा प्रकारचे) सांख्ययोगाचे विवरण केल्यानंतर सांगत आहेत, हे लक्षात घ्यावे.
आ. अद्वैत तत्त्वज्ञानातील ‘ब्रह्म सत्यं जगन्मिथ्या ।’ म्हणजे ‘ब्रह्म हेच एकमेव सत्य असून इतर सर्व मिथ्या आहे’, याचा अर्धवट अर्थ लावून ‘हे जगाकडे पाठ फिरवणारे तत्त्वज्ञान आहे’, हा आधुनिक काळात काही जणांकडून घेतला जाणारा आक्षेप संत ज्ञानेश्वर महाराज यांनी कसा झटकला आहे, हेही पहावे.
इ. त्या पाठोपाठच्या ओवीतच संत ज्ञानेश्वर श्रोत्यांना सांगतात,
आधींचि विवेकाची गोठी । वरी प्रतिपादी श्रीकृष्ण जगजेठी ।
आणि भक्तराजु किरीटी । परिसत असे ॥
– ज्ञानेश्वरी, अध्याय ४, ओवी २
अर्थ : आधीच आत्मा-अनात्मा विवेक यांसारख्या (सर्वश्रेष्ठ) विषयाचे प्रतिपादन आणि त्यातही जो विवेक जगन्नियंता साक्षात् परमात्मा श्रीकृष्ण सांगत आहे आणि भक्तश्रेष्ठ अर्जुन ऐकत आहे (असा संवाद श्रोतेहो तुम्हाला ऐकायला लाभत आहे).
ई. पुढे संत ज्ञानेश्वर महाराज सांगतात, ‘श्रोत्यांचे केवढे थोर भाग्य आहे की, त्यांना अमृताची गंगा प्राप्त झाली. त्यांची अनेक जन्मांची पुण्यकर्मे फळाला आली.’
उ. एके ठिकाणी ते म्हणतात, ‘श्रोतेहो, ही ज्ञानेश्वरी, म्हणजे तुम्ही माझ्याकडे ठेवलेले ‘तारण’ आहे. तुमच्याकडे जे कर्जाऊ (सर्वस्व) आहे, ते देऊन हे सोडवून घ्या. माझ्यानंतर ते नाहीसे होईल. मग तुम्ही काय करणार ?’
४. ‘श्रोत्यांना योग्य बोध व्हावा’, यासाठी संत ज्ञानेश्वर महाराज यांनी गीतेतील व्यक्तिरेखा स्वत:हून अधिक स्पष्ट करणे
संत ज्ञानेश्वर महाराज मधून-मधून गीतेतील चार व्यक्तिरेखांची वैशिष्ट्ये उलगडून दाखवतात. १४ व्या अध्यायाचे निरूपण पूर्ण झाल्यावर ते स्वतःहून एक संवाद धृतराष्ट्र आणि संजय यांच्या तोंडी घालतात. त्याचा आशय पुढीलप्रमाणे आहे.
धृतराष्ट्र : संजया, तू हे जे काही सांगत आहेस, ते सर्व तुला कुणी विचारले ? मी जे विचारले नाही, ते तू मला व्यर्थ का सांगत आहेेस ? तू या क्षणी माझ्या अंतःकरणातील प्रश्न सोडव. ‘विजयाची गुढी कुणाकडे उभारली जाईल ?’, हेे तू मला सांग. बाकीच्या या सर्व गोष्टी तू सोडून दे.
संजय (आश्चर्यचकित होऊन स्वगत) : अरे, भगवंतांनी किती रसभरित निरुपण केले आहे. ते याला (धृतराष्ट्राला) सुदैवाने घरबसल्या प्राप्त झाले आहे; परंतु ते त्याला आवडत नाही. याचे सुदैवाशीच कसे वैर आहे, ते पहा. कृपाळू श्रीकृष्ण याच्यावर प्रसन्न होऊन याचा अविवेकरूपी महारोग दूर करो !
असो. ही अगदी मोजकीच उदाहरणे झाली. संतांची थोरवी सांगायला लेखणी कायम अपुरीच पडणार. ज्ञानेश्वरीमध्ये चिरंतन अध्यात्म-तत्त्वज्ञान यांसमवेतच अन्यही बरेच काही ठायीठायी पुष्कळ आहे.’
(२.८.२०२३)
॥ श्रीगुरुचरणार्पणमस्तु ॥
– आधुनिक वैद्य दुर्गेश सामंत, रामनाथी, गोवा.