श्री गणेशमूर्तीच्या अवशेषाच्या साहाय्याने १४ वर्षांचा मुलगा ३६ घंटे तरंगत राहून समुद्रात बुडण्यापासून बचावला !

सूरत (गुजरात) – येथील समुद्रामध्ये ३६ घंटे श्री गणेशमूर्तीच्या साहाय्याने पाण्यात बुडण्यापासून वाचण्याची घटना एका १४ वर्षांच्या मुलाच्या संदर्भात घडली.

१. लखन नावाचा २९ सप्टेंबर या दिवशी त्याचा भाऊ, बहिण आणि आजी यांच्यासमवेत अंबाजी मंदिरामध्ये गेला होता. तेथून ते सर्व जण समुद्रकिनारी गेले. लखन आणि त्याचा भाऊ समुद्रात जाऊन खेळत असतांना मोठ्या लाटेमुळे ते खोल पाण्यात जाऊ लागले. लोकांनी आरडाओरड केल्यावर लखनच्या भावाला वाचवण्यात आले, तर लखन वाहून गेला. या घटनेची माहिती अग्नीशमन दलाला देण्यात आली; मात्र लखन याचा शोध लागला नाही.

२. त्यानंतर लखन याचा मृतदेह किनार्‍यावर येण्याची वाट पहात असतांना १ ऑक्टोबर या दिवशी लखन सुखरूप सापडल्याची माहिती त्याच्या वडिलांना नवसारी येथून दूरभाषद्वारे देण्यात आली. त्यानंतर लखनचे कुटुंबीय नवसारी येथे पोचल्यावर तो जिवंत असल्याचे दिसून आले.

३. लखन याने सांगितले की, समुद्रात वहात गेल्यावर एका गणेशमूर्तीचे अवशेष हाताला लागले. त्याला धरून तो समुद्रात तरंगत राहिलो. तेथून तो वहात नवसारी येथे पोचला. तेथे मासेमार्‍यांना तो दिसल्यावर त्यांनी त्याला रस्सीच्या साहाय्याने नौकेवर घेतले.

४. ‘अंबामातेच्या कृपेने लखन वाचला’, असे लखनच्या वडिलांनी सांगितले. लखन याला उपचारार्थ रुग्णालयात भरती करण्यात आल्यावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष सी.आर्. पाटील यांनी त्याची भेट घेतली.