ट्रुडो अभिव्यक्तीस्वातंत्र्यावर घाला घालत आहेत ! – मस्क

  • भारत-कॅनडा यांच्यातील वादात आता कोट्यधीश इलॉन मस्क जस्टिन ट्रुडो यांच्यावर भडकले !

  • ‘ऑनलाईन स्ट्रिमिंग’ सेवांवर नियंत्रण आणण्यासाठी ट्रुडो यांनी दिलेल्या आदेशावर मस्क यांची टीका !

‘एक्स’चे मालक कोट्यधीश इलॉन मस्क व कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो

ओटावा (कॅनडा) – ‘स्पेसएक्स’चे संस्थापक आणि अभिव्यक्तीस्वातंत्र्याचा पुरस्कार करणारे ‘एक्स’चे मालक कोट्यधीश इलॉन मस्क यांनी कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांच्यावर टीका केली आहे. ‘ट्रुडो अभिव्यक्तीस्वातंत्र्यावर घाला घालत आहेत’, असे ते म्हणाले. कॅनडा सरकारने एक आदेश जारी केला आहे. या अंतर्गत सर्व ऑनलाईन स्ट्रिमिंग सेवांना अधिकृत रूपाने सरकारकडे नोंदीकृत करावे लागणार आहे. या माध्यमातून या सेवांवर नियंत्रण आणण्याचा कॅनडा सरकारचा प्रयत्न असल्याचे म्हटले जात आहे. यावरूनच मस्क यांनी ट्रुडो यांच्यावर टीका केली.

पत्रकार आणि लेखक ग्लेन ग्रीनवाल्ड यांनी सामाजिक माध्यमांतून एक लिखाण (पोस्ट) प्रसारित करत म्हटले की, इलॉन मस्क यांनी म्हटले आहे की, ट्रुडो कॅनडामध्ये बोलण्याच्या स्वातंत्र्याला नष्ट करू पहातात. हे लज्जास्पद आहे !