गोवा : सत्तरी तालुक्यातील २ महिलांच्या ‘आधार कार्ड’वर समान क्रमांक

  • एका महिलेचे योजनेचे पैसे दुसर्‍या महिलेच्या बँक खात्यात जमा !

  • प्रशासनाच्या भोंगळ कारभाराचा नागरिकांना नाहक मनस्ताप !

पणजी, २८ सप्टेंबर (वार्ता.) : भारतीय नागरिकांसाठी ‘आधार कार्ड’ला विशेष महत्त्व आहे. सरकारी अथवा अधिकोषातील कामकाज यांच्यासाठी ‘आधार कार्ड’वरील १२ अंकी क्रमांकाला विशेष महत्त्व आहे. २ व्यक्तींना समान ‘आधार कार्ड’ क्रमांक मिळू शकत नाही; मात्र सत्तरी तालुक्यातील २ वयस्कर महिलांना एकच ‘आधार’ क्रमांक (२६४४ ७२१० १६५०) मिळाला आहे. दाबोस, सत्तरी येथील लक्ष्मी नारायण धुरी आणि सोनाळ, सत्तरी येथील मालिनी विष्णु गावकर या दोन्ही महिलांचा आधार क्रमांक एकच आहे. समान आधार क्रमांकामुळे मालिनी गावकर यांना विविध सरकारी योजनांखाली मिळणारे पैसे लक्ष्मी धुरी यांच्या अधिकोषातील खात्यामध्ये जमा होत आहेत. ‘पंतप्रधान किसान योजने’च्या अंतर्गत पैसे न मिळाल्याने चौकशी केली असता हा प्रकार उघडकीस आला. मालिनी गावकर यांची रक्कम लक्ष्मी धुरी सामंजस्याने तिला सुपुर्द करत आहे.

समान आधार क्रमांकामुळे मालिनी यांचे गॅसवरील अनुदान आणि शिधापत्रिका रहित

समान आधार क्रमांकामुळे मालिनी गावकर यांचे घरगुती वापराच्या गॅस सिलिंडरवरील अनुदान, तसेच शिधापत्रिका रहित झाली आहे आणि यामुळे त्या अडचणीत सापडल्या आहेत.

आधार क्रमांकाचा गोंधळ दूर करण्यासाठी मुंबईला जाण्याचा संतापजनक सल्ला

आधार क्रमांकाचा गोंधळ लक्षात आल्यावर मालिनी यांनी त्यात दुरुस्ती करण्यासाठी बराच खटाटोप चालवला आहे. मालिनी यांनी यापूर्वी वाळपई आरोग्य केंद्रातील ‘आधार कार्ड’ केंद्र आणि नंतर पर्वरी येथील ‘आधार कार्ड’ संबंधी मुख्य केंद्र या ठिकाणी तक्रार केली आणि अनेक वेळा हेलपाटे मारले. ‘आधार कार्ड’संबंधी ‘टोल फ्री’ क्रमांकावर तक्रार नोंदवा आणि तेथून प्रतिसाद मिळत नसल्यास मुंबई येथे जाऊन दुरुस्ती करा’, असा सल्ला ‘आधार कार्ड’ केंद्रातून देण्यात आला. मुंबईला जाऊन दुरुस्ती करणे मालिनी या ग्रामीण भागातील ज्येष्ठ (वयस्कर) महिलेला शक्य नाही. ‘आधार कार्ड बनवणार्‍या यंत्रणांच्या तांत्रिक दोषाची शिक्षा मालिनी यांनी का भोगावी ?’, असा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे. (मुख्यमंत्री यात लक्ष घालून आवश्यक उपाययोजना करतील का ? – संपादक) त्याचप्रमाणे गोव्यात अन्य नागरिकांसमवेतही असा प्रकार घडण्याची शक्यता असल्याने आधार क्रमांकावरून प्रत्येकाने सतर्क रहाण्याची आवश्यकता व्यक्त केली जात आहे.