विकृत वक्‍तव्‍याने ब्राह्मण संघटना संतप्‍त !

नगरला लवकरच महाअधिवेशनाचा संकल्‍प !

प्रतीकात्मक छायाचित्र

नगर – ऐतिहासिक नगर शहरातील ब्राह्मण संघटनांनी एकत्रित येऊन समाज एकीकरणाची वज्रमूठच बांधली. विकृत वक्‍तव्‍याने ब्राह्मण संघटना संतप्‍त झाल्‍या आहेत. शहरात लवकरच ब्राह्मण समाजाच्‍या महाअधिवेशनाचे आयोजन करण्‍याचा संकल्‍प करण्‍यात आला.

‘बहुभाषिक ब्राह्मण न्‍यासा’चे संस्‍थापक अध्‍यक्ष एन्.डी. कुलकर्णी प्रास्‍तविक करतांना म्‍हणाले, ‘‘महाराष्‍ट्रातील विविध भागांमधून विविध व्‍यक्‍तींनी ब्राह्मणविरोधी विकृत आणि महिलांविषयी अनादर बाळगणारे वक्‍तव्‍य केले आहे. त्‍या वक्‍तव्‍यामुळे ब्राह्मण समाज दुखावला गेला आहे. त्‍या वक्‍तव्‍यांचा निषेध करण्‍यासाठीच नगर शहरातील सर्व संघटना एकत्र आल्‍या आहेत. यापुढे ब्राह्मण समाजाच्‍या विरोधात कुणी बोलल्‍यास ते खपवून घेतले जाणार नाही. वैध मार्गाने कायदेशीर कारवाई करण्‍याचे ठोस पाऊल उचलले जाईल.’’

अधिवक्‍ता अच्‍युतराव पिंगळे यांनी शहरातील सर्व ब्राह्मण संघटनांनी चौपाटी कारंजा येथील स्‍वातंत्र्यवीर सावरकरांच्‍या पुतळ्‍यासमोर एक दिवस शुचिर्भूतपणे मौन बाळगून निषेध व्‍यक्‍त करावा, असे सुचवतांना कायदेशीर गोष्‍टींचा ऊहापोह केला. केडगांव ब्राह्मण संघाचे अध्‍यक्ष डॉ. श्रीकृष्‍ण जोशी यांनी यापुढे आपल्‍या समाजाच्‍या विरोधात बोलणार्‍यांचे दृकश्राव्‍य पुरावे गोळा करून शासनाला निवेदन दिले जाईल, अशी परखड चेतावणी दिली.