हिंदी भाषा जगातील सर्वांत मोठ्या लोकशाहीतील भाषांच्या विविधतेला एका सूत्रात बांधते ! – गृहमंत्री अमित शहा

केंद्रीय गृहमंत्री, तसेच सहकार मंत्री अमित शहा

पुणे – केंद्रीय गृहमंत्री, तसेच सहकार मंत्री अमित शहा यांनी देशवासियांना हिंदीदिनाच्या शुभेच्छा दिल्या. पुणे येथे तिसरे अखिल भारतीय राजभाषा संमेलन आयोजित केले होते. ‘जगातील सर्वांत मोठ्या लोकशाहीतील भाषांच्या विविधतेला हिंदी भाषा एका सूत्रात बांधते’, असे त्यांनी संदेशात म्हटले आहे.

या संदेशात अमित शहा पुढे म्हणाले की,

१. स्वातंत्र्यलढ्यातील खडतर काळात देशाला एका सूत्रात बांधण्याचे अभूतपूर्व काम हिंदी भाषेने केले आहे.
२. देशाची सृजनात्मक अभिव्यक्ती देशाच्या भाषेतून व्यक्त होते. हिंदी भाषा स्थानिक भाषांना सक्षम करण्याचे माध्यम बनेल.
३. आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून लोक, प्रशासन, शिक्षण आणि वैज्ञानिक उपयोग यांसाठी भारतीय भाषा उपयुक्त व्हाव्यात, यासाठी गृहमंत्रालयाचा राजभाषा विभाग प्रयत्न करत आहे. राजभाषेत केलेल्या कामांचा आढावा घेण्यासाठी ‘संसदीय राजभाषा समिती’ची स्थापना केली होती. सरकारी कामात हिंदीच्या उपयोगात झालेल्या प्रगतीचा अहवाल सिद्ध करून राष्ट्रपतींना सादर करण्याचे दायित्व या समितीला दिले होते.
४. देशाच्या विविध भागांत राजभाषेचा उपयोग वाढवा, या उद्देशाने आतापर्यंत ५२८ नगर राजभाषा कार्यान्वय समित्या स्थापन केल्या आहेत.
५. संयुक्त राष्ट्रांमध्ये हिंदी भाषेच्या वापराला प्रोत्साहन देण्यासाठी भारताने पुढाकार घेतला आहे.
६. राजभाषा विभागाच्या प्रयत्नांमुळे लोकसंमत असलेली हिंदी भाषा विज्ञान संमत आणि तंत्रज्ञान संमत बनवून समृद्ध राजभाषा म्हणून प्रस्थापित होईल, असा विश्वास अमित शहा यांनी व्यक्त केला.