पिंपरी (पुणे) नदीकाठच्या गावांना सतर्कतेची चेतावणी, पवना धरणातून ५ सहस्र ६०० क्युसेक पाण्याचा विसर्ग 

पिंपरी (जिल्हा पुणे) – मावळासह पिंपरी-चिंचवड शहराला पाणीपुरवठा करणारे पवना धरण १०० टक्के भरले आहे. ७ सप्टेंबरच्या रात्रीपासून मावळसह धरण परिसरात जोरदार पाऊस चालू आहे. त्यामुळे धरणातून ८ सप्टेंबरला सकाळी ६ वाजल्यापासून टप्प्याटप्प्याने पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आला आहे. एकूण ५ सहस्र ६०० क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. तसेच पावसाचा जोर अल्प अधिक पाहून यामध्ये पालट करण्यात येणार असल्याचे पवना धरणाचे शाखा अभियंता समीर मोरे यांनी सांगितले.

गेल्या १२ घंट्यांत ७८ मि.मी. पाऊस पडला आहे. तसेच मावळातील वडिवळे आणि आंद्रा धरणही १०० टक्के भरले आहे. त्यामुळे या धरणांतून इंद्रायणी नदीपात्रात पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेची चेतावणी दिली आहे. ‘पवना नदीकाठच्या नागरिकांनी नदीपात्रात उतरू नये, नदीमधील पाण्याचे पंप, नदीकाठचे शेती अवजारे आणि तत्सम साहित्य अथवा जनावरे असल्यास तात्काळ हलवण्यात यावेत’, असेही आवाहन करण्यात आले आहे.