भुयारी गटार योजनेचे काम करण्यासाठी कोल्हापूर महापालिकेला अडीच कोटी रुपये संमत !

मनकर्णिका कुंडात मिसळणार्‍या सांडपाण्याचे प्रकरण !

कोल्हापूर, ५ सप्टेंबर (वार्ता.) – जुलै २०२० मध्ये साडेतीन शक्तीपिठांपैकी एक असलेल्या श्री महालक्ष्मीदेवी मंदिराच्या परिसरात असलेले मनकर्णिका कुंड खुले करण्याच्या प्रत्यक्ष कामास प्रारंभ करण्यात आला. कुंड बर्‍यापैकी खुले झाल्यावर मंदिराचे पूर्वद्वार आणि त्या खालून सांडपाणी आत येते अन् हे सांडपाणी थेट मनकर्णिका कुंडात मिसळत असल्याचे लक्षात आले. सांडपाण्याची ही वाहिनी दुरुस्त करणे आणि पाणी बाहेर वळवणे हे काम महापालिकेचे होते; मात्र जवळपास ३ वर्षे त्यासाठी महापालिकेला निधीच उपलब्ध झाला नाही. त्यामुळे कुंड खुले होऊनही त्याचा विशेष उपयोग नव्हता. शेवटी ‘जिल्हा नियोजन समितीमधून हे काम करण्यासाठी महापालिकेला अडीच कोटी रुपये संमत झाले आहेत आणि लवकरच त्याची निविदा निघेल’, असे शहर अभियंत्यांनी सांगितले.

१. वास्तविक १० वर्षांपूर्वी मंदिरातील फरशी काम करतांना हे सांडपाणी बाहेरून वळवून घेण्याची हमी तत्कालीन नगरसेवक आणि महापालिका यांनी दिली होती. प्रारंभी १५-२० दिवस तसे झाले; मात्र परत हे पाणी कुंडात मिसळण्यास प्रारंभ झाला. पुराण वास्तूशास्त्रानुसार हे एक संरक्षित स्मारक घोषित केले आहे आणि त्याचे पावित्र्य राखले गेले पाहिजे. त्यामुळे कुंडाच्या रचनेत फेरफार करणे, विद्रूपीकरण करणे, धार्मिक भावना दुखावणे, या प्रावधानांआधारे संबंधित लोकांवर कारवाई करण्यात यावी. या संदर्भात अंबाबाई भक्त समितीचे श्री. प्रमोद सावंत यांनी दोन वर्षांपूर्वी जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले होते; मात्र त्यावर कोणतीच कारवाई झाली नाही.

२. मध्यंतरीच्या काळात हे काम करण्यासाठी महापालिकेकडे निधी नसल्याने पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने हे काम करण्याची सिद्धता दर्शवली होती आणि तसा प्रस्ताव त्यांनी नगररचना विभागाकडे पाठवला होता. नगररचना विभागाने याला मान्यता दिली नाही आणि हे काम महापालिकेनेच करावे, अशा सूचना दिल्या. या संदर्भात महापालिकेकडे निधीचे प्रावधान नसल्याने हे काम रखडले होते. आता निधी उपलब्ध होऊन हे काम पुढे सरकले आहे.

३. हे काम गुंतागुंतीचे असल्याने या कामाची निविदा प्रसिद्ध झाल्यानंतरही हे काम पूर्ण होण्यासाठी ६ ते ९ मासांचा कालावधी जाणार आहे. हे काम करतांना, प्रदक्षिणा मार्गही थांबवावा लागणार आहे.

४. मनकर्णिका कुंड आता बर्‍यापैकी खुले झाले असून या कुंडावर आता शेजारी असणार्‍या एका उपाहारगृहाचे बांधकाम आहे. या उपाहारगृहाच्या मालकाशी चर्चा झाली असून तीही अंतिम टप्प्यात असल्याचे जिल्हा प्रशासनाने सांगितले.

५. त्यामुळे कुंड मूळ स्थितीत येण्यासाठी भाविकांना साधारणत: वर्षभराची प्रतीक्षा अजून करावी लागणार आहे.

मनकर्णिका कुंड खुले होण्यासाठी गेली अनेक वर्षे हिंदु विधीज्ञ परिषद आणि हिंदु जनजागृती समिती यांनी सातत्याने लढा दिला आहे. कुंडावर शौचालय बांधले होते आणि ते हटवून कुंड खुले करण्यासाठी हिंदु विधीज्ञ परिषदेने सातत्याने पाठपुरावा केला अन् करत आहे.